Darshana Pawar Murder Case : MPSC टॉप केलेल्या दर्शना पवार हिच्या हत्येप्रकरणाचं गूढ जरी उघड झाले तरी अनेक प्रश्न कायम आहेत. दर्शना हिच्या हत्येच्या आरोपात पोलिसांनी तिचा मित्र राहुल हांडोरे याला मुंबई - पुणे असा प्रवास करण्याच्या तयारीत असताना 21 जून रोजी रात्री उशिरा मुंबईत अटक केली. त्यानंतर तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबात आपण हत्या केली, अशी राहुल यांनी कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याने हे कृत्य का केले, याचा उलगडाही त्याने केला आहे. दरम्यान, राहुल हांडोरे हा कोण आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
दर्शना आणि राहुल दोघेही 12 जूनपासून बेपत्ता होते. 18 जून रोजी राजगडाच्या पायथ्याजवळ दर्शना पवार हिचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. मात्र, राहुल मात्र गायब होता. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला आणि त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी पाच पथकांची नेमणूक करुन त्याचा शोध सुरु केला होता. त्याचवेळी राहुल हांडोरे यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली. त्यावेळी नातेवाईकांच्या मोबाईलवरुन पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधला. त्याला मोबाईलवरुनही पैसेही पाठवले. जेणे करुन तो कुठे आहे. त्याचे लोकेशन ट्रेस होईल. पोलिसांनी वापरलेली ही युक्ती त्यांच्या कामी आली आणि राहुल याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. दर्शना पवार हिचा मारेकरी राहुल हंडोरे याला पोलीस का पाठवायचे पैसे?, कारण की...
दरम्यान, राजगडाच्या पायथ्याशी सापडलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन केलेल्या अहवालात दर्शनाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर राहुल संशयाच्या फेऱ्यात अधिकच अडकला. अखेर त्याला मुंबईतून अटक करण्यात आली. दर्शना पवार हिने लग्नास नकार दिल्याने तिचा खून केल्याची माहिती समोर आली. राहुल हा दर्शनाच्या कुटुंबीयांना लग्नासाठी मागणी घालत होता. मात्र, कुटुंबीयांना त्यास नकार दिला होता. त्यामुळे राहुल बैचेन होता. त्याने दर्शनाला फिरायला जाऊ असे सांगून राजगडावर नेले आणि तिथे तिची हत्या केली. असे तपासात पुढे आलेय.
एमपीएससीची (MPSC) तयारीराहुल हांडोरे हाही करत होता. दर्शना एमपीएससीची तयारी करत होती. त्याचवेळी 28 वर्षांचा राहुलही MPSCची तयारी करत होता. तो गेली 4-5 वर्ष एमपीएससीची तयारी करत होता. त्यासाठी तो पुण्यात आला होता. त्याच्या लहान भावाबरोबर पुण्यातील कर्वेनगर भागात भाड्याच्या खोलीत तो राहत होता. त्याचे बीएस्सी पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. दरम्यान, अनेकवेळा डिलीवरी बॉय म्हणून राहुल काम करत पैसे कमवायचा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल MPSC ची तयारी करत होता. पुण्यात गेल्या काही वर्षांपासून तो पार्टटाईम जॉब करुन परीक्षा देत होता. सध्या तो वेगवेगळ्या फूड डिलिव्हरी सर्व्हिसेस साठी पार्टटाईम जॉब करत होता.
राहुल हा मुळचा नाशिक जिल्हातल्या सिन्नर लातुक्यातील शाहवाडी गावाचा रहिवासी आहे. त्याच्या घरची परिस्थिती सर्वसामान्य आहे. त्याचे वडील पेपर टाकण्याचे काम करतात. तो गेल्या काही वर्षांपासून पुण्यात त्याच्या भावासोबत राहत होता. त्याचा भाऊ सुद्धा हातावर रोजगार मिळवून पोट भरत होता.
राहुल एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी स्थानिक अभ्यासिकामध्ये जायचा. त्याला काही मोजके मित्र होते. तो डिलिव्हरीचे काम सांभाळत आपल्या अभ्यासात करत होता. 2023 सालची एमपीएससीची प्रीलीमीनरी परीक्षा त्याने दिली होती.
दर्शना आणि राहुल यांची लहानपणापासून ओळख आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. दर्शनाच्या मामाचे घर आणि राहुलचे घर हे समोरासमोर असल्याने त्यांची पूर्वीपासून ओळख होती. त्यानंतर ते पुण्यातही संपर्कात अल्याचे सांगितले जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार लग्नास नकार दिल्याच्या कारणामुळे राहुलने दर्शनाचा खून केल्याची माहिती मिळाली आहे. सध्या राहुल याला अटक करण्यात आली आहे. 18 जून 2023 रोजी वेल्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मृतदेह सापडला होता. त्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर दर्शना दत्तू पवार हीच असल्याचे स्पष्ट झाले.