4 वेळा सत्तेत, मग आरक्षण का दिलं नाही, आरक्षणाच्या मुद्यावरून फडणवीसांचा पवारांवर हल्ला

राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Jul 21, 2024, 06:42 PM IST
4 वेळा सत्तेत, मग आरक्षण का दिलं नाही, आरक्षणाच्या मुद्यावरून फडणवीसांचा पवारांवर हल्ला title=

Devendra Fadnavis On Sharad Pawar | राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. आरक्षणाच्या बैठकीला विरोधकांनी दांडी मारल्यानंतर सत्ताधारी चांगलेच तापले आहेत. आरक्षणाच्या मुद्यावरून आज देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना घेरलं आहे. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते. मग आरक्षण का दिलं नाही. असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना विचारला आहे. 

पुण्यातील भाजपच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. तुम्ही चार वेळा तिकडे रेकॉर्डवर सांगितले की, मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. मी नाही बोललो. कोण बोलले हे सर्वांना माहिती आहे. चार वेळा पवारसाहेब स्वत: मुख्यमंत्री होते. मग तेव्हा का मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही? असा सवाल फडणवीस यांनी पवारांना केला आहे. तसेच सध्या दोन समाजामध्ये पेट्रोल टाकण्याचं काम काही लोक सध्या करत आहेत. असा आरोप फडणवीसांनी केला आहे. 

...म्हणून आरक्षण गेलं

हो आम्ही आरक्षण दिलं, ते हायकोर्टातही टिकवलं. जोपर्यंत आमचं सरकार होतं. तेव्हा सुप्रीम कोर्टात तीन वेळा सुनावणी झाली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने स्टे द्यायला नकार दिला. सुप्रीम कोर्टात आरक्षण आम्ही टिकवलं. मात्र, त्यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं महाविकास आघाडी सरकार आलं आणि आरक्षण गेलं. या सरकारने हे आरक्षण टिकवण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही. अशी टीका फडणवीस यांनी ठाकरे आणि पवार यांच्यावर पुण्यातील मेळाव्यात केली आहे. 

मैदानात उतरा आणि ठोकून काढा

मी आज तुम्हाला परवानगी देतो. ज्याला बॅटींग करायचीय त्याने बॅटींग करा. मैदानात उतरा. फक्त अट एकच, हिट विकेट व्हायचं नाही. काही लोकं बोलायला उतरले की ते समोरच्या व्यक्तीवर बोलायचं सोडून आपल्याच व्यक्तींवर बोलतात. त्यामुळे चार दिवस त्याचीच उत्तर द्यावी लागतात. बाकी आदेश विचारु नका, मैदानात उतरा आणि ठोकून काढा. असा आदेश देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिला आहे.