Police Lathi Charge On Warkari : आळंदीत (Alandi News) वारकरी आणि पोलीसांमध्ये झटापट झाल्याची माहिती मिळाली होती. पालखी सोहळ्यावेळी मानाच्या वारकऱ्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जातो. मात्र इथं वारकऱ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे पोलीस आणि वारकरी आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केल्याचे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाले होते. त्यावर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माहिती घेत स्पष्टीकरण दिलं आहे.
आळंदीत कोणत्याही प्रकारचा लाठीमार झाला नाही. तिथं झटापट आणि बाचाबाची झाल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis Alandi Incident) दिली आहे. आम्हालाही आत सोडलं पाहिजे, असा आग्रह काही तरुण वारकऱ्यांनी केला होता. त्यावेळी पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी 400 ते 500 वारकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी तरुण वारकऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज झाला नाही. पोलिसांनी केवळ रोखण्याचा प्रयत्न केला, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.
आणखी वाचा - आळंदीत पालखी सोहळ्याला गालबोट, पोलिसांकडून वारकऱ्यांवर लाठीमार; पाहा Video
वारकऱ्यांना अडवताना काही पोलिसांना दुखापत झाली आहे. त्यानंतर सर्व परिस्थिती शांत झाली, असंही फडणवीसांनी सांगितलं. सर्व मानाच्या दिंडीचे प्रमुख यांची एक बैठक पार पडली होती. मागील वर्षी तिथे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती. चेंगराचेंगरी सारखा प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक मानाच्या दिंड्यांना 75 पासेस उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून चेंगराचेंगरी घडणार नाही, असा निर्णय घेण्यात आला होता, अशी माहिती फडणवीसांनी माध्यमांना दिली आहे. तसेच आळंदी येथे कोणताही लाठीचार्ज झालेला नाही, त्यामुळे न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका, असा सल्ला देखील फडणवीसांनी विरोधकांना दिला आहे.
वारकऱ्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट झाली, पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केलेला नाही. वारीला उगाच गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये, असं पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितलं आहे.