Best Treks in Maharashtra : महाराष्ट्राला अनेक गडकिल्ल्यांचा वारसा लाभला आहे. प्रत्येक किल्ल्याला कैक वर्षांचा इतिहास आहे. अनेक किल्ल्यांनी स्वराज्याचा लढा पाहिला आहे, कोणी परकीय आक्रमणं परतवून लावली आहेत. तर, काही किल्ले जणू एखाद्या कणखर मावळ्याप्रमाणं प्रांताच्या वेशीवर गस्त घालण्यासाठी निधड्या छातीनं उभे आहेत. महाराष्ट्रातील अशा वैशिष्ट्यपूर्ण किल्ल्यांची नावं घ्याल तितकी कमीच आहेत.
अशा या कणखर महाराष्ट्रातील थरकाप उडवणारा आणखी एक किल्ला म्हणजे ढाक बहिरी. महाराष्ट्राच्या रायगडमधील सांडशी गावात हा किल्ला उभा आहे. समुद्रसपाटीपासून साधारण 2700 फूट उंचीवर असणाऱ्या या किल्ल्याला स्थानिक ढक भैरी म्हणून संबोधतात. या किल्ल्याच्या ढाकच्या बाजूचा सुळका ‘कळकरायचा सुळका’ म्हणून ओळखला जातो.
ढाक किल्ल्यावर 3 लेणी कोरली असून, तिथवर पोहोचण्यासाठी मोठा कातळ ओलांडावा लागतो. या किल्ल्यातील गुहेवर दीड हजार फुटांची कातळभिंत आहे. या गुहेसमोर श्रीवर्धन आणि मनरंजन असे दोन किल्लेही दिसतात. या किल्ल्यावरून प्रबळगड, माथेरानसोबत कर्नाळ्यावरही त्या काळात स्पष्टपणे नजर ठेवता येत होती.
असं म्हणतात की, इतिहासकार गोपाल नीलकांत दांडेकर यांनी ढाक बहिरी या किल्ल्याचा शोध लावला. स्थानिकांच्या सांगण्यानुसार हा किल्ला देवदेवतांना समर्पित आहे. या भागात असणाऱ्या रहिवासी ठाकूर आदिवासींच्या बहिरी देवाला हा किल्ला समर्पित आहे. ज्यामुळं त्याचं नाव ढाक बहिरी असं पडल्याचं सांगितलं जातं. इथं किल्ल्यावर लेणीही असून, तिथं बहिरीचं प्रतीक असणारा शेंदुर फासलेला एक दगड आहे.
ढाक बहिरीचा चढ अतिशय आव्हानात्मक असल्यामुळं हा किल्ला कायमच गिर्यारोहक, साहस प्रेमींना आकर्षित करत असतो. पण, इथं नवख्या गिर्यारोहकांनी मार्गदर्शकाशिवाय येऊ नये अशाच सूचना केल्या जाता. किल्ल्याला असणाऱ्या चढाचा मोठा भाग कातळाचा असल्यामुळं इथं एक चूकही महागात पडू शकते किंबहुना आतापर्यंत अनेकांचा येथे घडलेल्या अपघातांमुळं मृत्यूही ओढावला आहे. त्यामुळं ढाक बहिरी हा महाराष्ट्रातील थरकाप उडवणारा किल्ला म्हणून अनेकांनाच ध़डकी भरवतो.
मुंबईहून ढाक बहिरी पर्यंत येण्यासाठी तुम्ही रस्तेमार्गानं कर्जतपर्यंत एसटीनं ययेऊ शकता. कर्जतवरूनच दुसरी एसटी तुम्हाला या किल्ल्याच्या मूळ गावापाशी आणून सोडेल. कर्जत रेल्वे स्थानकावरूनही तुम्हाला सांडशी गावापाशी जाण्यासाठी वाहनांची सोय उपलब्ध आहे.
पुण्याहून इथं पोहोचण्यासाठी बस, व्होल्वो किंवा कर्जतपर्यंत लोकलनं पोहोचण्याचीही सोय आहे. लोण्यावळ्यापर्यंत येऊनही तुम्ही कर्जत गाठून तिथून सांडशी गावामध्ये येऊ शकता. ढाक बहिरीपासूनच राजमाचीसुद्धा नजीक असल्यामुळं अनेकजण या किल्ल्यालाही भेट देण्याला प्राधान्य देतात.