मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केलेली तुलना अयोग्य असून याचे पडसाद आता राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत. 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन नव्या वादाला सुरुवात झाली आहे. भाजप नेते जय भगवान गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजचे छत्रपती शिवाजी महाराज असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या पुस्तकाच्या नावावरुवन आता पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भाजप मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस शाम जाजू यांच्या हस्ते या पुस्तकाचं शनिवारी प्रकाशन झालं.
'छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना देशातील मावळा कधीही सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा वेळोवेळी अपमान करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही,' असा इशारा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. (भूमिका स्पष्ट करा, चिडचीड करुन फायदा नाही, राऊतांचा टोला)
तसेच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यापाठोपाठ राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. सात पिढ्या जन्म घेतला तरी ते शक्य नाही,' अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
तसेच खासदार संजय राऊत यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. छत्रपतींची तुलना करणं योग्य नाही. कितीही मोठा नेता असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांशी त्याची तुलना योग्य नाही असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. नरेंद्र मोदी हे नरेंद्र मोदी आहेत. मोदी देशाचे नेते आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाचे असून त्यांची तुलना कोणाशी होणार नाही असे राऊत म्हणाले.
कधी मोदींना विष्णुचा तेरावा अवतार म्हटले जाते तर कधी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा दिली जाते. त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जातो. भाजपा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी असेही राऊत म्हणाले.
या पुस्तकात मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि खासदार संभाजीराजेंनी या तुलनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही असंही राजे म्हणाले आहेत.