मुंबई : 'भुमिका स्पष्ट करा, चिडचीड करुन फायदा नाही' असा टोला संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीराजे यांना लगावला. 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' पुस्तकावर सुरु असलेल्या वादावर ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी यावर बोलावे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती. त्यावर छत्रपती संभाजीराजे यांनी टीका केली होती. त्यानंतर संभाजीराजे-राऊत वाद सुरु झाला.
छत्रपतींची तुलना करणं योग्य नाही. कितीही मोठा नेता असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांशी त्याची तुलना योग्य नाही असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. नरेंद्र मोदी हे नरेंद्र मोदी आहेत. मोदी देशाचे नेते आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाचे असून त्यांची तुलना कोणाशी होणार नाही असे राऊत म्हणाले.
कधी मोदींना विष्णुचा तेरावा अवतार म्हटले जाते तर कधी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा दिली जाते. त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जातो. भाजपा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी असेही राऊत म्हणाले.
शिवरायांची मोदींशी तुलना केलेली पटते का, असा सवाल छत्रपतींच्या वंशजांना विचारणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीराजे यांचा रोष ओढवून घेतला होता. छत्रपती संभाजीराजे यांनी अगदी एकेरी उल्लेख करत संजय राऊत यांना करड्या शब्दात समज दिली होती. उद्धवजी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येकवेळी छत्रपती घराण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय. त्याने आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमावेळी सिंदखेडराजामध्ये काय बोललो आहे ते. त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही, असे संभाजीराजे यांनी म्हटले होते.