बीड : अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील जगमित्र साखर कारखाना प्रकरणात राज्याचे विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह दोन जणांवर अंबाजोगाई न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामुळे धनंजय मुंडे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. तळणी येथील शेतकरी मुंजा गिते यांची जमीन साखर कारखान उभारणीसाठी घेतली होती. मात्र, त्यांना दिलेला चाळीस लाख रुपयांचा धनादेश न वाटल्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासह इतरांवर बरदापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, कारवाई होत नसल्याने गिते यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी अंबाजोगाई न्यायलायात दोषारोपपत्र दाखल केले आहे. धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि सूर्यभान मुंडे या तिघांविरुद्ध हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय. शेतकऱ्याच्या जमिनीचे पैसे न दिल्याने धनंजय मुंडे यांच्याविरोधात न्यायालयात दाखल झालेल्या दोषारोपात्रामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार, निश्चित...
अंबाजोगाईतील तळणी गावात राहणाऱ्या मुंजा गिते यांची जवळपास तीन हेक्टर जमीन जगमित्र साखर कारखान्यासाठी ५० लाखांत खरेदी करण्यात आली होती. व्यवहारात ठरल्याप्रमाणे शेतकऱ्याला कारखान्याने अगोदर एक लाख आणि काही दिवसांनी ७ लाख ८१ हजार २५० रुपयांचा चेक दिला गेला. शिवाय या साखर कारखान्यात गिते यांच्या मुलासहीत आणखी चौघांना नोकरी देण्याचीही हमी देण्यात आली होती. गिते यांचा मुलगा, नातू आणि भावाच्या दोन मुलांना प्रतिमाह तीन हजार रुपयांप्रमाणे सहा महिने काम देऊन पगारही देऊ करण्यात आला. मुंडे यांच्यासाठी मुखत्यारपत्र वाल्मिक कराड आणि सूर्यभान मुंडे यांच्या नावावर करण्यात आलं. त्यानंतर मात्र कारखान्याच्या नावे परळी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या नावानं असलेला ४० लाख रुपयांचा चेक गिते यांना देण्यात आला... पण हा चेक अजूनही वटलेला नाही.
मुंजा गिते यांना साखर कारखान्यासाठी घेण्यात आलेल्या जमिनीचा संपूर्ण मोबदला देण्यात आलाय. त्याविषयीचे सगळे कागदपत्र कार्यालयात उपलब्ध आहेत, असं स्पष्टीकरण याआधी मुंडेंनी दिलं होतं. भारतीय जनता पक्षाचे काही नेते गेल्या चार वर्षांपासून मुंजा गिते यांच्या माध्यमातून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.