विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : भटके कुत्रे हा संभाजीनगर महापालिकेच्या डोक्याला ताप झालाय. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशी पालिकेची बिकट अवस्था आहे. कायद्यानुसार भटक्या कुत्र्यांना ठार मारता येत नाही. त्यामुळं नसबंदी करून कुत्र्यांची संख्या आटोक्यात राखण्याचा प्रयत्न महापालिका करते. मात्र 2016 पासून गेल्या सहा वर्षांत कुत्र्यांच्या नसबंदीवर किती खर्च झाला, याची आकडेवारी पाहिली तर धक्का बसेल.
कुत्र्यांच्या नसबंदीवर किती खर्च?
2015-16 मध्ये 672 कुत्र्यांच्या नसबंदीवर 4 लाख 20 हजार रुपये खर्च झाले
2016-17 मध्ये 307 कुत्र्यांसाठी 1 लाख 91 हजार रुपये,
2017-18 मध्ये 95 कुत्र्यांसाठी 67 हजार रुपये,
2018-19 मध्ये 3440 कुत्र्यांवर 30 लाख 96 हजार रुपये,
2019-20 मध्ये 4534 कुत्र्यांवर 43 लाख 7 हजार 300 रुपये,
2020-21 मध्ये 10681 कुत्र्यांवर 1 कोटी 1 लाख रुपये,
तर 2021-22 मध्ये 8824 कुत्र्यांवर 83 लाख रुपये
असे आतापर्यंत एकूण 2 कोटी 66 लाख रुपये नसबंदीवर खर्च झाले, अशी आकडेवारी माहिती अधिकारात समोर आलीय...
खर्चावर भाजपाचा आक्षेप
मात्र त्यावर भाजपनं आक्षेप घेतलाय. कुत्र्यांच्या नसबंदीसाठी कधी राजस्थानातून, कधी झारखंडमधून, तर कधी उस्मानाबादमधून एजन्सी नेमण्यात आल्या. या सगळ्या एजन्सी शिवसेनेशी संबंधित लोकांच्या असल्याचा आरोप भाजपनं केलाय. शिवसेनेकडून मात्र या घोटाळ्यावर कुणीही बोलायला तयार नाही. तर दुसरीकडं कुत्र्यांच्या नसबंदीमुळं नागरिकांना दिलासा मिळाल्याचं महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं.
कुत्र्यांच्या नसबंदीवर झालेला हा खर्च खरोखरच डोळे विस्फारून टाकणारा आहे. नसबंदी नको, पण खर्च आवर. असं म्हणण्याची वेळ आलीय. या पैशातून खरंच नसबंदी झाली की, कुत्र्यांच्या नावावर कुणाची तरी चांदी झाली याची चौकशी होणं गरजेचं आहे.