मुंबई: दिवाळी म्हटलं की उत्साह आणि आनंदाला उधाण येतं. यावेळी मुलांमध्येही नाही म्हटलं तरी फटाके फोडण्याचा उत्साह जास्त असतो. अशावेळी बरेचदा पालकांची नजर चुकवून फटाके फोडायला जाणारी देखील मुलं असतात. पण फटाके फोडण्याच्या काही पद्धती जीवावर बेतू शकतात याचा अंदाज या मुलांना नसतो. तुम्ही किंवा तुमच्या घरातील मुलं अशा प्रकारे फटाके फोडत नाहीत ना याकडे लक्ष द्या.
आता तुम्हाला सतर्क करणारी एक अतिशय महत्वाची बातमी आहे. दिवाळीत फटाके वाजवताना काळजी घ्या. एखादी छोटीशी चूकही तुम्हाला भारी पडू शकते. विशेष करून गटारावर फटाके फोडल्यामुळे नेमकं काय होऊ शकतं याची प्रचिती काही मुलांना आली.
फटाके वाजवण्याचा मुलांचा उत्साह होता. कुठे वाजवायचे तर रस्त्यावर गाड्या वेगात होत्या. मुलांनी गटाराच्या झाकणावर फटाके ठेवले. तिथे फटाके लावण्याचा त्यांचा प्रयोग धोक्याचा ठरला. फटाके फोडण्याची मजा तर सोडाच पण क्षणार्धात इथं आगीचा भडका उडाला.
नेमकं काय घडलं ? हे कळायच्या आतच आगीच्या अशा ज्वाळा पसरल्या. तिथून वेळीच पळ काढला म्हणून मुलं थोडक्यात बचावली. हा व्हिडीओ सूरतच्या योगीचौकातील असल्याचं सांगितलं जात आहे.
या आगीमागे शास्त्रीय कारण असल्याचं सांगितलं जात आहे. गटारात कचरा, मलमूत्र, विष्ठा यांचं विघटन होऊन मिथेन गॅसची निर्मिती होते. मिथेन गॅस ज्वलनशील असतो. आगीशी संपर्क येताच हा वायू पेट घेतो. त्यामुळे फटाके वाजवताना काळजी घ्या. गटारात तयार होणारा वायू ज्वलनशील असल्यानं गटारावर फटाके फोडू नका. नाहीतर मोठी दुर्घटना घडू शकते.