परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, ठाणे कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

एप्रिलमध्ये परमबीर सिंह आठ दिवसांची रजा घेऊन गेले होते, पण त्यानंतर पुन्हा हजर झालेले नाहीत

Updated: Oct 28, 2021, 07:20 PM IST
परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, ठाणे कोर्टाकडून अटक वॉरंट जारी
संग्रहित फोटो

ठाणे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात ठाणे कोर्टाने (Thane Court) अटक वॉरंट जारी केलं आहे. खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटींच्या खंडणी वसुलीचा आरोप केल्यावर परमबीर सिंग यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर महाविकास आघाडीने परमबीर सिंग यांच्याविरोधात कारवाई सुरु केली. 

परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल करण्यात आले. ठाणे पोलिसांनी सिंग यांना चौकशीसाठी बोलावलं, पण त्यांनी काहीच प्रतिसाद न दिल्याने ठाणे पोलिसांनी सिंह यांच्याविरोधआत लुकआऊट नोटीस बजावली होती. 

परमबीर सिंग यांचं वेतन रोखण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने गृहरक्षक दलाला दिले आहेत. एप्रिलमध्ये परमबीर सिंह आठ दिवसांची रजा घेऊन चंदीगडला गेले होते. पण त्यानंतर परमबीर सिंह पुन्हा हजर झालेले नाहीत. परमबीर सिंह यांच्या विरोधात मुंबई आणि ठाण्यात अनेक एफआईआर दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी परमबीर सिंह यांना अनेक वेळा समन्स पाठवलं, पण परमबीर सिंह यांच्याकडून कोणतंच उत्तर मिळालेलं नाही.