माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल! चंद्रकांत पाटील यांचं पुन्हा सूचक विधान

चंद्रकांत पाटील यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे

Updated: Sep 16, 2021, 02:20 PM IST
माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल! चंद्रकांत पाटील यांचं पुन्हा सूचक विधान title=

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका विधानावरुन राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. देहूमध्ये एका कार्यक्रमासाठी चंद्रकांत पाटील आले होते. त्यावेळी मंचावरून सूत्रसंचालकानं त्यांचा उल्लेख माजी मंत्री असा केला. त्यावर लागलीच चंद्रकांत पाटील यांनी माजी मंत्री म्हणू नका असं विधान केलं. येत्या दोन ते तीन दिवसांत कळेल अशी पुष्टी जोडायलाही ते विसरले नाहीत. 

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरून भाजपची साथ सोडून, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच भाजप पुन्हा महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी 'ऑपरेशन लोटस' सुरू करणारी अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. भाजप नेतेही वेळोवेळी महाराष्ट्रात भाजपची सत्ता येईल असं विधान करताना दिसतात. याआधी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अशी वक्तव्य केली आहेत.

महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेतही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 'महाराष्ट्र उद्ध्वस्त करायला निघालेल्यांना सांगू इच्छितो की, तुमचा काळ संपलाय. राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येणार आहे', असा विश्वास व्यक्त करत यावेळी राणेंनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये बळ आणण्याचा प्रयत्न केला होता.

आम्ही लवकरच सत्तेत येऊ असं विधान भाजपचे नेते गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं करतायेत. मात्र सत्ता स्थापन करण्यात अद्याप यश आलेलं नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी हे विधान गंमतीने केलं की खरंच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होतोय, हे जाणून घेण्यासाठी ते म्हणतात तशी दोन ते तीन दिवस वाट पाहावी लागेल.