Sharad Pawar on EC Shiv Sena issue: केंद्रीय निवडणूक आयोगाने 'शिवसेना' आणि 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये मागील काही महिन्यांपासून पक्षावरील हक्क वादाला या निर्णयाने नवं वळण मिळालं आहे. हा निकाल जाहीर केल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आम्ही या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं. मात्र एकीकडे उद्धव यांनी पुढील संघर्षासाठी तयार राहण्याचे संकेत समर्थकांना दिले आहेत. मात्र महाविकास आघाडीमधील सर्वात प्रमुख नेते असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता या प्रकरणात काहीही होणार नाही असं मत व्यक्त केलं आहे. पवार यांनी पक्ष आणि चिन्ह ठाकरेंच्या हातून गेलं असून आता नवीन चिन्ह स्वीकारावं लोक ते स्वीकारतील असं म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद आणि मुख्यमंत्री शिंदेंनी शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर प्रतिक्रिया नोंदवली आहे. दरम्यान मुंबईमध्येच पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी आता या प्रकरणात काहीही करता येणार नाही असं म्हणत काढता पाय घेतल्याचं दिसत आहे. पत्रकारांनी पवारांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला गेल्याची घोषणा केल्याच्या संदर्भ देत पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नावर पवारांनी अगदी स्पष्टपणे उत्तर देताना काँग्रेसबरोबर असा प्रकार घडलेला तेव्हा काय झालं होतं हे सांगितलं.
'शिवसेना' आणि 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्यात आलं आहे याबद्दल काय सांगाल असं पवारांना विचारण्यात आलं. त्यावर शरद पवार यांनी, "इलेक्शन कमिशनचा निकाल आहे. एकदा त्यांचा निर्णय लागल्यावर त्याचं काही करता येत नाही. तो स्वीकारायचा. नवीन चिन्ह घ्यायचं. त्याचा काही फार परिणाम होत नसतो," असं उत्तर दिलं.
पवार एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी काँग्रेसबरोबर असाच प्रकार घडल्याचं नमूद केलं. "असाच एकदा काँग्रेस आणि इंदिरा गांधींमध्ये वाद झाला. त्यावेळी काँग्रेसची बैलजोडी खुण असायची. काँग्रेसने हात घेतला आणि लोकांनी मान्य केलं. आता नवीन (चिन्ह) देतील लोक मान्य करतील. त्याचा फार परिणाम होत नाही. एक महिना 15 दिवस चर्चा होईल," असं पवार म्हणाले.
शिंदे गटाने बंडखोरीनंतर वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबरच्या महाविकास आघाडी युतीमध्ये आपल्याला योग्य तो मानसन्मान, निधी मिळाला नाही असे आरोप केले आहेत. आजही मुख्यमंत्री शिंदेंनी, "मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गहाण टाकलेला धनुष्यबाण सोडवला," अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.