खडसेंच्या उद्याच्या भूमिकेकडे लक्ष, खान्देशात मोठया घडामोडीची शक्यता

खडसेंचा राग कमी झालेला नाही. ते उद्या आपली भूमिका सकाळी ११.३० वाजता स्पष्ट करणार आहेत.  

Updated: Oct 3, 2019, 09:05 PM IST
खडसेंच्या उद्याच्या भूमिकेकडे लक्ष, खान्देशात मोठया घडामोडीची शक्यता title=
संग्रहित छाया

मुंबई : भाजपच्या तिसऱ्या यादीतही मंत्री विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव नसल्याने या नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, राज पुरोहितही गॅसवर आहेत. केवळ चार उमेदवारांची तिसरी यादी जाहीर भाजपकडून जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत नावे नसल्याने दुसऱ्या यादीत नावे असतील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, दुसऱ्या यादीतही निराशा झाली. तिसऱ्या यादीत चार उमेदवार घोषित करण्यात आले. त्यामुळे खडसे प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांच्या समर्थकांनी अपक्ष लढण्याचा त्यांना आग्रह केला आहे. पक्ष देईल, ती जबाबदारी स्विकारण्याची तयारी खडसे यांनीच बोलून दाखवली. मात्र, खडसेंचा राग कमी झालेला नाही. ते उद्या आपली भूमिका सकाळी ११.३० वाजता स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे भाजपकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार का, याची उत्सुकता आहे.

आपले वय झाले आहे. मी आजारी असतो. कार्यकर्त्यांनी संयम बाळगा. पक्ष मोठा आहे. तो जो निर्णय देईल, तो मान्य असेल, असे सांगत खडसे यांनी वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. मात्र, असे असले तरी खडसे प्रचंड नाराज आहेत. आपला काय गुन्हा, एवढी का शिक्षा, असा सवालही त्यांनी याआधी विचारला आहे. तिसऱ्या यादीत खडसेंचे नाव असेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होते. परंतु भाजपची चार उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली. मात्र या यादीतही एकनाथ खडसे, उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता आणि राज पुरोहित यांचं नाव नाही. त्यामुळे हे सर्व दिग्गज वेटिंगवर आहेत. पहिल्या तीन याद्यांमध्ये नाव न आल्यामुळे तावडे, बावनकुळे नाराज आहेत. तर खडसेंनी मात्र पक्षाच्या आदेशाचं पालन करणार असल्याचे सांगितले तरी ते आपली भूमिका उद्या सकाळी स्पष्ट करणार आहेत.

खान्देशात आज काहीतरी गडबड होणार की काय, अशी चर्चा सकाळी होती. भाजपचा मोठा नेता राष्ट्रवादीच्या गळाला लागणार की काय, असा अंदाज लावला जात होता. पण मग स्वतः खडसेच समोर आले आणि खडसेंचं काय होणार, याचं उत्तर त्यांनी स्वतःच दिले. एकनाथ खडसेंनी उमेदवारी यादीत नाव येण्याआधीच फॉर्म तर भरला. पण आता हाच फॉर्म मागे घेण्याची वेळ खडसेंवर येणार आहे. 

भाजपा कुठल्याही परिस्थितीत एकनाथ खडसेंना तिकीट द्यायला राजी नाही. खडसेंवरचे भ्रष्टाचाराचे आरोप सरकारवरचे तिरकस बाण आणि वय यामुळे खडसेंना यंदाच्या निवडणुकीत तिकीट द्यायला पक्ष तयार नाही. अखेर पक्ष घेईल तो निर्णय मान्य करण्यावाचून खडसेंकडे दुसरा पर्याय उरलेला नाही. पण त्याचवेळी मी का नको, याचं उत्तरही खडसेंनी मागितले आहे. 

खडसेंना भाजप तिकीट डावलणार याचे संकेत मिळताच राजकीय वर्तुळात मोठमोठ्या चर्चा रंगल्या. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मुंबईहून जळगावसाठी निघाले. शरद पवारांनीही खडसेंबद्दल एक गौप्यस्फोट केला. पण शरद पवारांचा दावा खडसेंनी फेटाळला. आता मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसेंना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. सलग सहा टर्म आमदार झालेला आणि कालाय तस्मै नमः म्हणणाऱ्या नेत्यावर वारसा पुढच्या पिढीवर सोपवण्याची वेळ आली आहे.