कल्याण : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजपाकडे असलेल्या या मतदारसंघात आमदार गणपत गायकवाडांविरोधात शिवसेनेच्या धनंजय बोडारे यांनी बंड केलं आहे. मतदारांमध्ये संभ्रम राहू नये म्हणून कल्याणच्या १६ आणि उल्हासनगरच्या १० शिवसैनिकांनी राजीनामे दिले आहेत. मतदारसंघातल्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले. 'मात्र याचा उपयोग होणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बंडखोरांवर कारवाई करतील,' असा सज्जड दम पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला आहे. कल्याण पश्चिम येखे शिवसेना उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारासाठी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात एकनाथ शिंदे बोलत होते. कल्याण-डोंबिवलीच्या सर्व मतदारसंघांमध्ये युतीचाच विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कल्याण पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे हे शिवसेनेच्या नावाखालीच प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये देखील संभ्रमाचं वातावरण आहे. असं असलं तरी शिवसेना निवडणुकीनंतर धनंजय बोडारे आणि इतर नगरसेवकांवर काय कारवाई करते हे पाहावं लागणार आहे.
कल्याण पूर्व या मतदारसंघावर अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी सलग दोन वेळा निवडून येत वरचस्व कायम ठेवलं होतं. त्यांनंतर तिसऱ्यांदा ते भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. २०१४ मध्ये मोदी लाटेतही गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले होते. कल्याण पूर्व मतदारसंघातून यंदा एकूण १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
पाहा उमेदवारांची संपूर्ण यादी