पावसाळ्यात विजेचा शॉक बसण्याचा धोका; घरात आणि बाहेर कोणती काळजी घ्याल?

How To Save From Current In Monsoon: पावसाळ्यात विजेचा झटका लागून जखमी व मृत्यू होण्याच्या दुर्घटनांमध्ये वाढ होते. अशावेळी काय करता येईल या टिप्स जाणून घेणे प्रत्येकासाठीच महत्त्वाचे आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 27, 2023, 07:08 PM IST
पावसाळ्यात विजेचा शॉक बसण्याचा धोका; घरात आणि बाहेर कोणती काळजी घ्याल? title=
Electrical safety tips for the monsoon season in marathi

How To Save From Current In Monsoon Season: महाराष्ट्रात मान्सून (Monsoon) दाखल झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. पावसाळ्यात सखल भागात पाणी साचते. नकळत या पाण्यात विजेची तार पडलेली असू शकते. त्यामुळं पाण्यातून चालताना विशेष सावधानी बाळगण्याची गरज आहे. पावसाळ्यात अशा अनेक दुर्घटना घडू शकतात. काही दिवसांपूर्वीच दिल्लीत विजेचा झटका लागून एका महिलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर, पुण्यात  तारांच्या कपाऊंडला हात लागल्यामुळं एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पावसाळ्यात विजेचा शॉक लागण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी सुरक्षिततेची काळजी आपणच घ्यायची गरज आहे. घरात व बाहेर असताना आपण काय काळजी घ्यायची गरज आहे?, याचा घेतलेला आढावा

घरासाठी या टिप्स लक्षात ठेवा

भिंती आणि छतातून पाणी गळतेय का तपासा

घरातील भिंती आणि छतातून पाणी गळत तर नाहीये ना? याची वेळीच खात्री करुन घ्या. जर छत गळत असेल तर भिंतींना वॉटरप्रुफ कोटिंगने भरुन घ्या. भिंतीतून पाणी झिरपत असेल तर ते विजेच्या तारांपर्यंत पोहोचण्याची भिती असते त्यामुळं घरात करंट पसरू शकतो. 

पावसाळा सुरू होण्याआधीच घरात एका इलेक्ट्रिशियनला बोलवून घरातील विजेच्या तारांची चाचपणी करुन घ्या. विजेची तार, स्विच बोर्ड आणि डोरबेल पाण्याच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्या. 

याची काळजी घ्या

- घरात विजेचे नवे स्विच बसवून घ्या. जुने स्विच पाण्याच्या थोड्याशा जरी संपर्कात आले तरी घरात करंट पसरू शकतो. 
- घरात विजेचे कोणतेही काम करायचे असल्यास इलेक्ट्रिशियनची मदत घ्या.
- ओल्या हाताने विजेवर चालणारे कोणतेही उपकरण सुरू करु नका 

घराबाहेर पडताना ही काळजी घ्या 

- पावसाच्या पाण्यातून चालताना विजेच्या खाबांचा आधार घेऊ नका 
- सखल भागात पाणी साचले असल्यास त्या पाण्यातून चालणे टाळा
- विजेचा खांब असलेल्या ठिकाणी कार व बाईक पार्क करणे टाळा
- वाऱ्याने विजेचे खांब खाली पडले असतील किंवा विजेच्या तारा खाली लोंबकळत असतील तर तिथून चालणे टाळा
- विजेचा खांबांवर एखाद्या धातुने बनवलेल्या शिडीने चढण्याचा प्रयत्न करु नका

रस्त्यावरुन चालताना जर तुम्हाला एखादी तार तुटलेली दिसली तर त्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ महावितरणच्या कार्यालयात फोन करुन कर्मचाऱ्यांची याबाबत माहिती द्या. अशा घटनांकडे दुर्लक्ष केल्यामुळं मोठी दुर्घटना घडू शकते.