अकोल्यात शाळेतील निवडणुकीसाठी ईव्हीएमचा वापर

या निवडणुकीत कोणीही बोगस मतदान किंवा जादा मतदान केले नाही. 

Updated: Aug 26, 2019, 10:22 AM IST
अकोल्यात शाळेतील निवडणुकीसाठी ईव्हीएमचा वापर title=

जयेश जगड, झी मीडिया, अकोला: विरोधकांकडून निवडणुकीत ईव्हीएम यंत्राच्या वापराला विरोध होत असतानाच अकोल्यातील शाळेत एक अभिनव उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील पाचमोरी येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीसाठी इव्हीएमचा वापर करण्यात आला. या निवडणुकीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांसह पाच मंत्र्यांची निवड करण्यात आली. 

ही निवडणूक मोबाईल अँपच्या साहाय्याने पार पाडली. विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेची माहिती व्हावी, यासाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. सदर निवडणूक प्रक्रियेत एकूण सहा जागांसाठी आठ विद्यार्थी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. प्रत्येक मतदार सहा जागांसाठी मतदान करत होता. या निवडणुकीत कोणीही बोगस मतदान किंवा जादा मतदान केले नाही. 

सरशी कुणाची? निवडणूक आणि ईव्हीएम वाद

मतदान केलेल्या विद्यार्थ्यांच्या बोटाला शाई लावण्यात आली. या निवडणुकीत १०० टक्के मतदान झाले. सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या कार्यालयात बोलावून सर्वांच्या उपस्थितीत मुख्याध्यापिका मनिषा शेजोळे यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर केला. 

यावेळी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, आरोग्यमंत्री, स्वच्छतामंत्री, वनसंवर्धन मंत्री, क्रीडामंत्री असे सहा मंत्री निवडण्यात आले आहेत. या सर्वांचे पेन व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच दैनंदिन जीवनाशी थेट संबंध असणाऱ्या गोष्टींचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला होता. अशाप्रकारे इव्हीएमचा (EVM) वापर करून शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेणाऱ्या पाचमोरी शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.