Dindori LokSabha : दिंडोरीचा किल्ला भाजप राखणार? भारती पवारांना कोण देणार टक्कर?

Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरीचा किल्ला भाजप राहणार? असा प्रश्न विचारला जात आहे. भाजपकडून डॉ. भारती पवारांना पुन्हा संधी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून उमेदवारीबाबत संभ्रम आहे.

सौरभ तळेकर | Updated: Mar 27, 2024, 08:57 PM IST
Dindori LokSabha : दिंडोरीचा किल्ला भाजप राखणार? भारती पवारांना कोण देणार टक्कर?  title=
Bharati Pawar, MVA, Dindori LokSabha

Dindori LokSabha Election 2024 : दिंडोरी... नाशिक जिल्ह्यातील पारंपरिक आदिवासी बहुल मतदारसंघ... रेल्वेचं मोठं जाळ असलेलं मनमाड शहर... लासलगावची प्रसिद्ध कांदा बाजारपेठ... ओझरचा एचएएलचा विमान निर्मिती कारखाना... येवल्याची जगप्रसिद्ध पैठणी... निफाडची द्राक्षं... आणि आदिमाया आदिशक्तीचा वणी सप्तश्रृंगी गड याच मतदारसंघातला... मात्र एवढा महत्त्वाचा असा हा भाग नाशिकच्या तुलनेत कायम मागासच राहिला.

दिंडोरी... समस्यांची नगरी

मनमाड जंक्शन आहे, मात्र इथून सुटणाऱ्या रेल्वेगाड्या इतरत्र पळवण्यात आल्या. कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारचं धोरण हा कांदा उत्पादक शेतक-यांच्या दृष्टीनं नेहमीच चिंतेचा विषय राहिलाय. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारांचा हा मतदारसंघ... मात्र पाच वर्षांत एखादं मोठं हॉस्पिटल इथं उभं राहिलं नाही. दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण या आदिवासी बहुल तालुक्यांना निसर्गानं भरभरून दान दिलं. मात्र तिथं पर्यटन विकास झालाच नाही.

दिंडोरीचं राजकीय गणित

2009 मध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला राहिलाय. भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी पहिल्यांदा मालेगाव आणि नंतर दोनवेळा दिंडोरीतून विजयाची हॅटट्रिक केली. 2009 मध्ये चव्हाणांनी राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवळांचा केवळ 37 हजार मतांनी पराभव केला. 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालिन उमेदवार भारती पवारांना तब्बल अडीच लाख मतांनी धूळ चारली.
2019 मध्ये भाजपनं चव्हाणांना ब्रेक दिला आणि डॉ. भारती पवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. मोदी लाटेवर स्वार होत भारती पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनराज महालेंचा सुमारे २ लाख मतांनी पराभव केला.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे 4, तर भाजप आणि शिवसेनेचा प्रत्येकी 1 आमदार निवडून आला.

पहिल्यांदाच खासदार झालेल्या डॉ. भारती पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रात आरोग्य राज्यमंत्रीपद दिलं. यंदा पुन्हा एकदा त्यांना लोकसभेची उमेदवारी भाजपनं दिलीय. तर दुसरीकडं महाविकास आघाडीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शरद भास्कर भगरे यांचं नाव चर्चेत आहे. माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाशिक दौ-यात पवारांची भेट घेतल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात. तर इंडिया आघाडीतला घटकपक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे. पी. गावित यांनीही उमेदवारीवर दावेदारी केलीय. गेल्या निवडणुकीत त्यांनी लाखभर मतं घेतली होती.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या कामावर दिंडोरीतली जनता फारशी समाधानी नाही. कांदा निर्यात धोरणावरून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मात्र मोदींचा करिश्मा आणि राममंदिराची उभारणी याचा फायदा भारती पवारांना होईल, अशी अपेक्षा आहे. दिंडोरीत सध्या तरी महायुतीचं वर्चस्व दिसून येतंय. असं असलं तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणारी सहानुभूती महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. कुणाला उमेदवारी मिळते, यावर दिंडोरीचं भवितव्य अवलंबून असणाराय. अर्थातच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका निर्णायक ठरणाराय.