LokSabha: भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील एकमेव उमेदवाराचं नाव आहे. भाजपाने अमरावतीमधून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नवनीत राणा यांच्या नावाला विरोध असतानाही भाजपाने नवनीत राणा यांना तिकीट जाहीर करत सर्वांना धक्का दिला आहे. महायुतीचा भाग असणारे बच्चू कडू यांनी तर आपण नवनीत राणा यांना पाडणार असा निर्धारच जाहीर केला आहे. तर शिंदे गटाचे आनंद अडसूळ यांनी तर आपण विरोधात उभा राहणार असल्याची घोषणा केली आहे.
"आम्ही नवनीत राणा यांचा प्रचार अजिबात करणार नाही. 100 टक्के याची खात्री देतो. नवनीत राणा यांना ही निवडणूक अजिबात सोपी जाणार नाही. निकाला तुम्हाला 100 टक्के दिसेल," असं बच्चू कडू म्हणाले आहेत. दरम्यान नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार द्यायचा की नाही याचा लवकर निर्णय घेऊ असं ते म्हणाले आहेत.
"नवनीत राणा यांचा विजय होणार नाही याची खात्री करु. 100 टक्के त्यांना पाडणार," असा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. त्यांचा पराभव कसा करायचा हे आम्ही ठरवू असं ते म्हणाले आहे. दरम्यान आम्ही विरोधात प्रचार करताना आम्हाला महायुतीत ठेवायचं की नाही याचा निर्णय ते घेतील असंही ते म्हणाले आहेत. काम सरो, वैद्य मरो अशी आपली अवस्था झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
बच्चू कडू आणि आनंद अडसूळ आपला प्रचार करतील असं राणा यांनी म्हटलं आहे. त्यावर बच्चू कडू यांनी ही त्यांच्या बापाची जहागीर आहे का? अशी विचारणा केली. आमची गरज नसल्याने, लाचारी करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. काही केलं तरी आम्ही प्रचार कऱणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दुसरीकडे शिंदे गटाचे आनंद अडसूळ यांनीही नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. ही राजकीय आत्महत्या असल्याची टीका त्यांनी केली आहे. "हे निर्लज्ज असल्याने कोणतंही विधान करतात. आम्ही आमची लाज, शरम विकलेली नाही. स्वाभिमान विकलेला नाही. आमच्या जीवावर आम्ही निवडणूक लढू शकतो आणि लढणार. मीच विरोधात उभा राहणार आहे," अशी घोषणाच आनंद अडसूळ यांनी केली आहे.
भाजपाने ही उमेदवारीची घोषणा केली असून, महायुतीची घोषणा नाही. ज्याप्रमाणे आढळराव-पाटील यांच्या उमेदवाराची तिन्ही पक्षांमध्ये आधी चर्चा झाली आणि नंतर राष्ट्रवादीत प्रवेश झाला. तसं इथे काही झालं नाही. मीच त्यांच्याविरोधात आता निवडणुकीला उभा राहणार असं आनंद अडसूळ यांनी सांगितलं आहे.