अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांब्यात अन्नत्याग आंदोलन सुरू केलेल्या तिन्ही मुलींची प्रकृती खालावलीय. शुभांगी जाधव नावाच्या मुलीची प्रकृती अधिकच खालावल्यानं रात्री प्रशासनानं तिला अहमदनगर जिल्हा रुग्णालयात हलवलंय. परंतु, शेतकऱ्यांना कर्जमाफी अशी मागणी घेऊन उपोषणाला बसलेल्या या मुलीने रुग्णालयातही अन्न नाकारले आहे. सलाईनवरच उपचार घेऊन थोडं बरं वाटल्यावर पुन्हा उपोषण स्थळी दाखल होणार असल्याचा निर्धार तिनं व्यक्त केलाय.
उल्लेखनीय म्हणजे, शेतकरी कन्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. दीड वर्षापूर्वी सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ तसंच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 'किसान क्रांती' या संघटनेच्यावतीनं पुणतांबा येथे शुभांगी जाधव, पूनम जाधव, निकिता जाधव या उच्चशिक्षित शेतकरी कन्यांनी अन्नत्याग करून सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे.
आंदोलनाच्या चौथ्या दिवशी अर्थात गुरुवारी अहमदनगर जिल्हाधिकारी उपोषणस्थळी उपस्थित झाले होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अन्नत्याग केलेल्या या मुलींची भेट घेऊन सुमारे एक तास चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी उपोषण थांबविण्याची विनंतीही मुलींना केली. मात्र त्या आपल्या मागणीवर ठाम राहिल्या. त्यानंतर, जिल्हाधिकारी प्रसिद्धी माध्यमांशी काहीही न बोलता स्थळावरून निघून गेले.