फूड डिलेव्हरी बॉईजची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश

डिलिव्हरी बॉईजची नोदणी देखील अन्न व औषध प्रशासनाने बंधनकारक केली आहे.

Updated: May 16, 2019, 02:28 PM IST
फूड डिलेव्हरी बॉईजची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश title=

जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : खाद्यपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या फूड डिलेव्हरी बॉईजची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. आरोग्य तपासणीनंतर घरपोच खाद्यपदार्थ पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉईजची नोदणी देखील अन्न व औषध प्रशासनाने बंधनकारक केली आहे.

सध्या खाद्यपदार्थांच्या ऑनलाईन डिलिव्हरीचा व्यवसाय मोठ्या तेजीत आहे. खाद्यपदार्थांची ऑनलाईन सेवा पुरावणाऱ्यांमध्ये झोमॅटो, स्वीगी आणि उबेर ईट्स या कंपन्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. ग्राहकांकडून मोबाईल अॅपच्या मध्यमातून ऑर्डर मिळाल्यानंतर हॉटेलमधून ग्राहकांपर्यंत खाद्य पदार्थ पोहचवण्याची जबाबदारी ही फूड डिलिव्हरी बॉईजची असते. खाद्य पदार्थांवर भलेही एफडीएची नजर असली तरी संबंधित डिलिव्हरी बॉईजच्या आरोग्याबद्दल माहिती उपलब्ध नसते. 

या फूड डिलिव्हरी बॉईजना कुठला आजार किंवा संसर्गजन्य रोग नाही हे तपासण्याची सध्यातरी कुठलीच व्यवस्था नाही. त्यामुळे हॉटेल ते थेट ग्राहकांपर्यंत खाद्य पदार्थ पोहचविण्याची जबाबदारी ज्या डिलिव्हरी बॉईज वर आहे त्यांच्या वैद्यकीय तपासणीचे निर्देश नागपूरच्या अन्न व औषध विभागाने दिले आहे. 

या डिलिव्हरी बॉईजच्या आरोग्य तपासणीची जबाबदारी संबंधित कंपनीवर सोपवण्यात आली आहे. मान्यताप्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून डिलिव्हरी बॉईजची वैद्यकीय तपासणी करून त्यांची नोंदणी अन्न व औषध विभागाकडे करायचे आहे. एफडीएच्या या निर्णयामूळे ग्राहकांचा देखील कंपन्यांवर विश्वास वाढेल असे सांगत डिलिव्हरी बॉईजनी याचे स्वागत केले आहे.

ऑनलाईन खाद्य पदार्थ मागवण्याचे प्रमाण वाढले आहे. खाद्यपदार्थ पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉईजचा खाद्य पदार्थासोबत संपर्क येत नसला तरी आवरणाला त्यांचा स्पर्श होतो. त्यातूनही आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्वचारोग किंवा एखादा संसर्गजन्य आजाराचा त्रास असेल तर त्याचा संसर्ग ग्राहकांनाही होण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याची वेळीच काळजी घेण्यासाठी अन्न व औषध विभागाने डिलिव्हरी बॉईज ची वैद्यकीय तपासणी बंधनकारक केली आहे.