'भीती कोरोनाची वाटायला हवी, लसीची नाही' क्लिनिकल ट्रायलमध्ये लहानग्यांचा विश्वास

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या लहान मुलांच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये 6 ते 12 या वयोगटातील मुलांना लस देण्यास आजपासून सुरुवात झाली. 

Updated: Jun 16, 2021, 09:46 PM IST
'भीती कोरोनाची वाटायला हवी, लसीची नाही' क्लिनिकल ट्रायलमध्ये लहानग्यांचा विश्वास

नागपूर : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेनंतर देशभरात तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका लहान मुलांना राहील, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. यादृष्टीने आतापासूनच योग्य त्या उपाययोजना आखल्या जात आहेत. नागपुरात लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी करण्यात आली आहे.

कोव्हॅक्सिन लसीची क्लिनिकल ट्रायल

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या लहान मुलांच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये 6 ते 12 या वयोगटातील मुलांना लस देण्यास आजपासून सुरुवात झाली. नागपुरातील मेडिट्रीना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या रुग्णालयात लहान मुलांसाठी ही क्लिनिकल ट्रायल सुरू होती. सहा जूनला 12 ते 18 वयोगटातील 40 मुलांना लस देण्यात आली होती. या वयोगटातील मुलांच्या लसीकरणानंतर कोणालाही दुष्परिणाम जाणवले नव्हते. त्यामुळे आता 6 ते 12 वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. आज 20 मुलांना लस देण्यात आली. काही दिवसांनी 2 ते 6 या वयोगतासाठी लसीकरण सुरू केलं जाणार आहे.

लस घ्यायला भीती वाटत नाही

लसीसाठी 110 मुलं स्वयंसेवक म्हणून हजर झाली होती. त्यापैकी 35 मुलांची छाननी करण्यात आली. त्यांची रक्त तपासणी, आरटी पीसीआर चाचणी घेण्यात आली. 'लस घ्यायला भीती वाटत नाही, भीती कोरोनाची असावी लसीची नाही' असं क्लिनिकल ट्रायलसाठी आलेल्या मुलांनी म्हटलं.