रब्बी हंगामात खतांच्या दरात अव्वाच्या सव्वा वाढ, खतांचे दर भिडले गगनाला

अस्मानी संकटानं हैराण झालेल्या बळीराजावर महागड्या खतांमुळे  बेजार, पाहा कोणत्या खतांच्या किंमती किती रुपयांनी वाढवण्यात आल्या

Updated: Jan 17, 2022, 06:08 PM IST
रब्बी हंगामात खतांच्या दरात अव्वाच्या सव्वा वाढ, खतांचे दर भिडले गगनाला  title=

मुंबई : बळीराजा आधीच अवकाळी पावसाच्या धुमशानामुळे हैराण आहे. त्यात आणखी एक संकट समोर ठाकलं आहे. रब्बी हंगाम जोमात असताना खतांची मागणी वाढली आहे. खतांच्या किमतीत पिशवीमागे 50 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे. 

आधीच अवकाळीमुळे बेजार झालेल्या शेतक-याचं पार गणितच बिघडलं आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात खत उत्पादकांनी खतांच्या किमती जाहीर केल्या. मात्र, काही दिवसांपूर्वी अचानक खतांच्या किमती वाढवण्यात आल्या. 

रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रात लागवडयोग्य क्षेत्र वाढलंय. गहू, हरभरा, ज्वारी आणि कांद्यासाठी खतांची मागणी वाढलीय. मात्र अचानक दरवाढीमुळे शेतक-याला मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

किती रुपयांनी वाढते दर

10:26:26 या खताची 1470 रुपयांना मिळणारी पिशवी आता 1640 रुपयांना मिळत आहे.
12:32:16 या खताची 1470  रुपयांची पिशवी 1640 रु  रुपयांवर गेली आहे.
16:20:0:13 या खताचे दर 1050 वरून थेट 1350  रूपयांवर गेले आहेत.
15:15:15:09 या खताचे दर 1080 वरून 1350  रूपयांवर गेले आहेत.
अमोनियम सल्फेटची 875 रुपयांची पिशवी 1000 रुपयांना मिळू लागली आहे

16:20:0:13 या खताचे जुने दर 1050 होते ते तब्बल 1350 तर 15:15:0:9 खताचे जुने दर 1080 रुपये एवढे होते. नवे दर 1350 रुपयांवर गेलेत खतांच्या वाढलेल्या किमतीबद्दल झी 24 तासनं बातमी दाखवताच कृषिमंत्री दादा भुसे यांनी केंद्रीय खते आणि रसायनमंत्री मनसुख मंडाविया यांना पत्र लिहिलं आणि खतांचे दर कमी करून पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.

राज्यातला शेतकरी आधीच कोरोना, गारपीट आणि अवकाळीचा तडाखा सहन करत आहे. त्यात खतांच्या किमती वाढल्यानं त्याचं जगणंच अवघड झालं आहे. अस्मानी संकटांना पर्याय नाही पण आधीच पिचलेल्या बळीराजाला खतांच्या किमती कमी करून थोडा का होईना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारनं करायला हवा.