अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : आमचं पुणं हे राहण्यासाठी सर्वोत्तम असल्याच्या त्रिकालाबाधित सत्यावर आता अधिकृतपणे शिक्कामोर्तब झालंय. आणि त्यात आमच्या पूर्वजांचं वगैरे काही श्रेय असेल तर त्याची कल्पना आम्हाला नाही. आज जे काही घडतंय ते केवळ आजच्या पुण्याच्या कारभाऱ्यांमुळे हा आमचा ठाम विश्वास आहे... तो व्यक्त करण्याची घाई आमच्या कारभाऱ्यांना लागली असेल तर त्यात गैर ते काय?
राहण्यासाठी म्हणून देशाच्या पाठीवर पुण्यासारखं शहर नाही, असा निर्वाळा थेट केंद्रीय शहरी मंत्रालयानं दिलाय. हा बहुमान कुणामुळे प्राप्त झाला, याची चर्चा ही झालीच पाहिजे. म्हणूनच तर सर्वेक्षणाचा निकाल जाहीर होताच शहरातल्या 'शहाण्यांनी' स्वतःचे ढोल वाजवायला सुरुवात केलीय. प्रशासन, शिक्षण, आरोग्य, रोजगार, घरं, कचरा , पाणी अशा विविध घटकांचा एकत्रित विचार केला असता सरासरी गुणांच्या आधारे पुण्यानं पहिला क्रमांक पटकावलाय. त्याच्या श्रेयासाठीची ही लढाई आहे.
श्रेय घेण्याची इतकी घाई असेल तर या पुढाऱ्यांनी शहरात रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीचंही श्रेय घ्यावं... शहराच्या मधोमध वाहणाऱ्या मुळा - मुठेला गटार बनवल्याचंही श्रेय घ्यावं... आवाक्याबाहेर गेलेल्या घरांच्या किमतींचंही श्रेय घ्यावं... वगैरे, वगैरे.... यादी खूप मोठी आहे...
सरतेशेवटी पुणेकर म्हणून टोमणे खाण्याची आणि त्याहीपेक्षा टोमणे देण्याची सवय आम्हाला आहेच. पण माणसाला हसतखेळत आंनदी जीवनाकडे घेऊन जाणारी पुणेकर ही प्रवृत्ती आहे हे लक्षात घ्यावं लागेल... त्याचंच फलित म्हणजे हा निकाल आहे.