बीड : होळी आणि रंगपंचमी हा अनेकांचा आवडता सण... या सणाच्या आठवणी अनेकांनी आपल्या मनात जपून ठेवल्यात. मात्र, बीडच्या त्या गावातील जावयांना मात्र ती आठवण नकोशी असते. त्याचं कारणंही तसंच आहे.
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील विडा हे गाव. या गावात साडेसात हजार लोकसंख्या आहे. तर गावात 150 घरजावई कायम स्वरुपी वास्तव्यास आहेत. पण, होळीचा सण जसा जवळ येतो तसे बीडच्या त्या गावातील जावई पसार होऊ लागतात. मग पसार झालेल्या जावयांना शोधण्यासाठी गावकऱ्यांची तारांबळ उडते.
विडा गावातील त्या अनोख्या परंपरेमुळे गावातील जावई पसार होतात. गेली दोन वर्ष कोरोनामुळे या गावातील ती प्रथा बंद होती. मात्र, यंदा पुन्हा ही प्रथा सुरु करण्याचं गावातील तरुणांनी ठरवलं. या तरुणांचा हा मनसुबा जावयांना कळला आणि त्या जावयांनी गावातून हळूहळू पोबारा करण्यास सुरवात केली.
गावची प्रथा सुरु तर ठेवायची, पण जावई नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण, तीन दिवसानंतर एक जावई ही प्रथा पाळण्यास तयार झाला. ही प्रथा अशी आहे की, धुलिवंदनाच्या दिवशी एखाद्या जावयाला गाढवावर बसवलं जातं. त्याची गाढवावर मिरवणूक काढली जाते. यावेळी त्याच्या गळ्यात चपलांचा ता हारही घातला जातो.
थोडक्यात गाढवावरून काढल्या जाणाऱ्या या मिरवणुकीमुळे वाडा गावातील जावई होळी आली की पसार होत असतात. यंदा. या गाढवावरील मिरवणुकीचा मान अर्थात होळीच्या उत्सावाचा मान जावई अमृत देशमुख यांना मिळालाय. अमृत देशमुख यांना विड्याच्या युवकांनी गावामध्ये आणून त्यांचा सत्कार केला.
विडा येथे मागील 10 दशकांपासून जावयाला गाढवावर बसवून मिरवणूक काढण्याची ही अनोखी परंपरा सुरु आहे. धुलिवंदनाच्या काही दिवस आधी जावईबापूंची शोधमोहीम हाती घेण्यात येते. कोणता जावई कुठे आहे याचा तपास करण्यासाठी पथकंही नेमली जातात.
जावई सापडला तर संपूर्ण गावातून वाजत गाजत त्याची मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर गावातील मारुतीच्या मंदिराजवळ येऊन या जावयाला नवीन कपड्याचा आहेर दिला जातो. गाढवावर बसवण्यात आलेल्या जावयाला पुन्हा दुसऱ्यांदा बसवण्यात येत नाही. धुलिवंदनाच्या या आनंदात गावकऱ्यांसह काही जावई मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. पण, काही असले तरी अशा विचित्र थट्टेतून जावयाचा सन्मान करणारे विडा हे देशातले एकमेव गाव आहे.