close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

यांत्रिक नौकांद्वारे मासेमारीवर दोन महिने बंदी

जून आणि जुलै महिन्यात सागरी जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. 

Updated: May 19, 2019, 11:07 PM IST
यांत्रिक नौकांद्वारे मासेमारीवर दोन महिने बंदी

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : पावसाळी कालावधीत मासे व अन्य सागरी जीवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असते. त्यामुळे १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांच्या काळासाठी राज्याच्या सागरी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांद्वारे मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू राहणार नाही, असा आदेश राज्याच्या मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाने जारी केला आहे.

जून आणि जुलै महिन्यात सागरी जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेला वाव मिळून मत्स्यसाठ्याचे जतन होते. तसेच खराब आणि वादळी हवामानामुळे मच्छीमारांची जीवित व वित्त हानी टाळणे शक्य होते. त्यामुळे सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापर्यंत राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे.

बंदी कालावधीत यांत्रिक नौकांद्वारे मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे पकडण्यात आलेले सर्व मासे जप्त करण्यात येणार आहेत. 
बंदी कालावधीमध्ये सागरी क्षेत्रामध्ये यांत्रिक मासेमारी नौकेच्या चलनवलनास पूर्णत: बंदी राहील. मासेमारी करताना यांत्रिक नौकेस अपघात झाल्यास शासनाकडून देण्यात येणारी नुकसान भरपाई  मिळणार नाही. 

ज्या मच्छीमार सहकारी संस्थांच्या नौका मासेमारी करताना आढळतील, अशा संस्थांनी पुरस्कृत केलेले अर्ज राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेच्या लाभासाठी विचारात घेतले जाणार नाहीत, असे मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाने काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्याच्या सागरी क्षेत्राबाहेर खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या नौकांना केंद्र शासनाच्या खोल समुद्रांतील मासेमारीबाबतचे धोरण लागू राहणार आहे.