दख्खनच्या परिसरात आदिमानवांच्या पाऊलखुणा, 3 ते 4 लाख वर्षांपूर्वीची आढळली हत्यारं

दख्खनच्या प्रदेशामध्ये आदिमानव होता, असे पुरावे आता हाती आलेत. 

Updated: Jun 24, 2021, 10:09 PM IST
दख्खनच्या परिसरात आदिमानवांच्या पाऊलखुणा, 3 ते 4 लाख वर्षांपूर्वीची आढळली हत्यारं
प्रतिकात्मक फोटो

कोल्हापूर : राज्याचा इतिहास काही लाख वर्ष मागे नेणारी ही बातमी. दख्खनच्या प्रदेशामध्ये आदिमानव होता, असे पुरावे आता हाती आलेत. पूर्वी या भागात सापडलेल्या दगडी हत्यांरांचा कालखंड थेट आदिमानवाच्या काळात नेणारा आहे. कोल्हापूर आणि दख्खनच्या पठारावर आदिमानवांचं अस्तित्व होतं, याचे पुरावे संशोधकांच्या हाती लागलेत. 

पुण्यातल्या डेक्कन कॉलेजमधील पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट गेली काही वर्ष यावर संशोधन करतंय. त्यांना कोल्हापूरच्या हिरण्यकेशी नदी परिसरात अश्मयुगीन हत्यारं आढळून आली आहेत. ही हत्यारं दीड ते 7 लाख वर्षांपूर्वीची असावीत, असा अंदाज आहे. 

हिरण्यकेशी आणि वेदगंगा नद्यांच्या गाळामध्ये ही हत्यारं आढळून आली आहेत.  हातकु-हाड, फरशी, चिरा अशी तीन प्रकारची ही हत्यारं आहेत. आजरा आणि मडिलगे येथे मिळालेली दगडी हत्यारे बसाल्ट आणि क्वार्टझाईट प्रकारच्या दगडांनी बनवली आहेत. शिकार करण्यासाठी किंवा मेलेल्या जनावरांची हाडं तोडण्यासाठी त्यांचा वापर होत असावा. 

'होमो इरेक्टस' ( Homo erectus ) या प्रजातीमधल्या आदिमानवांचा 10 ते 15 लोकांचा गट इथं आला असावा, असा अंदाज आहे. भूगर्भीय अभ्यासाच्या आधारे त्यांचा कालखंड निश्चित करण्यात आलाय. तो दीड लाख ते 7 लाख वर्षांपूर्वीचा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय. 

या नव्या संशोधनामुळे कोल्हापूर आणि संपूर्ण दख्खन पठाराच्या पुरातन इतिहास समोर आलाय. यात सखोल संशोधन केल्यास प्रागैतिहासिक कालखंडावर अधिक प्रकाश पडू शकेल.