सोनू भिडे, नाशिक:
बँक खात्याचे आधारकार्ड आणि पॅन कार्ड अपडेट करण्याचा मेसेज किंवा फोन करून खातेधारकांना फसविण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहे. याबाबत पिडीत व्यक्ती कडून पोलिसांकडे तक्रार केली जाते. गुन्हा दाखल होतो तो अज्ञात व्यक्ती विरोधात. मात्र बँकेने खातेधारकाची माहिती लिक केल्याचा आरोप पिडीत व्यक्तीने केल्याने प्रथमच नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात एचडीएफसी बँकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी झाली फसवणूक
विजयकुमार गोविंदराव ठुबे (वय ६२, रा. नांदेड सिटी, पुणे) हे सेवानिवृत्त आहे. ठुबे पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत होते. त्यांचे एचडीएफसी बँकेत खात आहे. ठुबे खाजगी कामानिमित्त नाशिकला आले होते. रविवारी सकाळी त्यांना अज्ञात मोबाईल नंबर वरून ‘बँकेचे पॅनकार्ड अपडेट करा. अन्यथा खाते बंद होईल’, असा मेसेज पाठवण्यात आला होता. या मेसेज मध्ये पॅनकार्ड अपडेट करण्याची बनावट लिंक देण्यात होती. या लिंकवर ठुबे यांनी क्लिक करुन बँक खात्याविषयी गोपनीय माहिती अपलोड केली. यानंतर त्यांना ओटीपी पाठवण्यात आला. हा ओटीपी त्यांनी टाकल्यावर त्यांच्या खात्यातून १ लाख ९९ हजार ३४२ रुपये परस्पर दुसऱ्या खात्यात वर्ग झाले. ही बाब मंगळवारी ठुबे यांच्या लक्षात आली. त्यांनी त्वरित बँकेत आणि सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. सायबर पोलिसांनी ठुबे यांच्या तक्रारीनुसार अज्ञात मोबाइल धारक, फसवणुकीची रक्कम वर्ग झालेल्या खातेधारकाविरुद्ध आणि सदर बँकेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
चोरांना पुरविली जाते खातेधारकांची माहिती
खातेधाराकाने स्वतःची दिलेली वैयक्तिक माहिती हि गुपित ठेवण्याची जबाबदरी बँकेची असते. मात्र बऱ्याच वेळा खातेधारकाची वैयक्तिक माहिती त्याचा महिन्याचा खर्च, बँकेतील शिल्लक, सिव्हील स्कोर, त्याच्यावर असलेले लोन याची माहिती खाजगी बँकांना पुरविली जाते. याचा फायदा सायबर चोर घेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
खातेधारकांनी हि घ्या काळजी
आपल्या बँकेच्या अकाउंट बद्दल कोणालाही माहिती शेअर करू नये.
बँकेच्या अॅपचा पासवर्ड नेहमी बदलत राहणे गरजेचे आहे.
अज्ञात नंबरवरून आलेल्या मेसेजला कोणताही प्रतिसाद देऊ नये.
अज्ञात नंबरवरून आलेली लिंक खात्री झाल्याशिवाय ओपन करू नये.
शक्य असल्यास बँकेची सर्व कामे बँकेत जाऊन करावी ऑनलाईन टाळावे.