नाशिकमध्ये परदेशी भाजीपाल्याची यशस्वी लागवड

शेतकरी नेहमीच आपला शेतमाल बाजार समितीत नेऊन व्यापारी आणि दलालांना विकतो. मात्र ज्या दरात शेतकरी शेतमाल विकतो त्याच्या तिप्पट दरानं व्यापारी त्याची विक्री करतो. त्यामुळं शेतक-यांच्या हाती काहीच लागत नाही. हीच बाब लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यातील काही शेतक-यांनी चक्क परदेशी भाजीपाला पिकाची यशस्वी लागवड केलीय. तसंच त्यांनी स्वत:चं मार्केटिंगचं तंत्र अवगत केलंय.  

Updated: Nov 6, 2017, 08:27 PM IST
नाशिकमध्ये परदेशी भाजीपाल्याची यशस्वी लागवड title=

योगेश खरे ,नाशिक : शेतकरी नेहमीच आपला शेतमाल बाजार समितीत नेऊन व्यापारी आणि दलालांना विकतो. मात्र ज्या दरात शेतकरी शेतमाल विकतो त्याच्या तिप्पट दरानं व्यापारी त्याची विक्री करतो. त्यामुळं शेतक-यांच्या हाती काहीच लागत नाही. हीच बाब लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यातील काही शेतक-यांनी चक्क परदेशी भाजीपाला पिकाची यशस्वी लागवड केलीय. तसंच त्यांनी स्वत:चं मार्केटिंगचं तंत्र अवगत केलंय.  

नासिक जिल्ह्याच्या जाखोरी गावातील या शेतात पिकणारा भाजीपाला केवळ मुंबई- पुणेच नाही तर देशभरातील फाईव्हस्टार हॉटेल आणि बड्या मॉलमध्ये विक्रीसाठी पाठवला जातो. इथं देशी नाही तर विदेशी भाजी-पाला पिकवला जातोय. ही आहे कळमकर कुटुंबीयांची एक्झॉटिक व्हेजिटेबल शेती...खरं तर द्राक्ष बागेसाठी हा परिसर ओऴखला जातो. मात्र द्राक्षशेती बेभरवशाच्या झाल्यामुळं आता इथला शेतकरी हळूहळू वेगळ्या पिकांकडं वळू लागला असून कळमकर कुटुंबीय त्यापैकीचं आहे. त्यांनी आपल्या शेतात लेट्युस,ब्रोकोली, सेलेरी, बेझील अशी विविध विदेशी भाजी-पाला पिकांची लागवड केली आहे. 

पारंपारिक भाजीपाला पिकाच्या तुलनेत या भाजीपाल्यावर कमी प्रमाणात कीड आणि रोगाचा धोके असतो. त्यामुळे हे पीक फायदेशीर ठरलं असून नव्या पिढीसोबतच जुन्या पिढीनंही हा बदल स्विकारला आहे. 

या भाजीपाल्यासाठी बाजारपेठ शोधण्याचं मोठं आव्हान कळमकर कुटुंबासमोर होतं. मात्र त्यांना व्याप-यांना भाजीपाल्याची विक्री न करता स्वत: मार्केटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आकर्षक पॅकेजिंग करुन मोठ्या शहरातील पंचतारांकीत हॉटेल्स आणि मॉल्समध्ये विक्री सुरु केली. कळमकर कुटुंबातील नव्या पिढीनं मार्केटिंग तंत्र अवगत केलं आहे.  

कळमकर कुटुंबीयांनी विदेशी भूमीवर पिकणारी भाजीपाल्याची शेती य़शस्वी केली असून त्यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळू लागलं आहे. मुंबईची परसबाग म्हणून नाशिकची ओळख असून देशीसोबतच आता परदेशी भाजीपाला पीकही मुळं धरु लागलं आहे.