भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांना तीन महिन्यांचा कारावास

भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम ( Raju Todsam) यांना तीन महिन्यांचा कारावास ठोठावण्यात आला आहे. 

Updated: Jan 22, 2021, 07:38 AM IST
भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांना तीन महिन्यांचा कारावास  title=

यवतमाळ : भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम ( Raju Todsam) यांना तीन महिन्यांचा कारावास ठोठावण्यात आला आहे. (Former BJP MLA Raju Todsam jailed for three months)वीज वितरणाविरोधात आंदोलन करताना लेखापालाला मारहाण करणे त्यांना चांगलेच भोवले आहे. पांढरकवडा सत्र न्यायालयाने राजू तोडसाम यांना ही शिक्षा सुनावली. त्यामुळे तोडसाम यांची कारागृहात रवानगी झाली आहे. 

केळापूर मतदारसंघाचे भाजपाचे माजी राजू तोडसाम यांनी 2013 मध्ये वीज वितरण कंपनीत आंदोलन करताना लेखापालाला मारहाण आणि शिवीगाळ केली होती. याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली. राजू तोडसाम यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वरिष्ठ न्यायालयात धाव घेतली होती. तीन महिने कारावासाची कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली शिक्षा वरिष्ठ न्यायालयानेही कायम ठेवली आहे. त्यामुळे राजू तोडसाम यांची रवानगी यवतमाळ जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे. 

तोडसाम यांनी महावितरणच्या सहायक लेखापालास मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा दोष सिद्ध झाल्याने त्यांना तीन महिने साधा कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा पांढरकवडा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी २७ नोव्हेंबर २०१५ ला ठोठावली होती. त्या शिक्षेला तोडसाम यांनी अतिरिक्त सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणाच्या अंतिम सुनावणीदरम्यान पांढरकवडा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. बी. नाईकवाड यांच्या न्यायालयाने ती शिक्षा कायम ठेवली आहे.