शिवसेनेचे माजी आमदार यांच्या गाडीला अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू

माजी आमदार आणि शिवसेना नेते दिलीप माने यांच्या गाडीला अपघात झाला.  

Updated: Jan 14, 2020, 05:32 PM IST
शिवसेनेचे माजी आमदार यांच्या गाडीला अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू

सोलापूर : माजी आमदार आणि शिवसेना नेते दिलीप माने यांच्या गाडीला अपघात झाला. माने यांच्या कारची दुचाकीस्वारास समोरासमोर जोराची धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. माजी आमदार दिलीप माने सहकुटुंब म्हसवडच्या सिध्दनाथ दर्शनासाठी जाताना हा अपघात झाला. दरम्यान, दिलीप माने कुटुंबीय सुखरूप आहेत.

शहाजी राऊत (५५ रा. तांदूळवाडी) असे या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर दिलीप माने आणि त्यांचा चालक किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे. माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे मंगळवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला. तर माने यांच्या कारचे मोठे नुकसान झाले.

माने हे आपल्या कारने म्हसवडकडे देवदर्शनासाठी निघाले होते. यावेळी तांदुळवाडीनजीक साळमुख रोडवरील स्वामी समर्थ मंगल कार्यालय शेजारी त्यांच्या कारची समोरून येणार्‍या दुचाकीस जोराची धडक झाली. यात दुचाकीस्वार शहाजी राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.