प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : रेशनवरील धान्य आणि काळाबाजार हे जणू समीकरणच बनले आहे. यासंदर्भातील अनेक तक्रारी दररोज येत असतात. पण आता या रायगड वासियांची सुटका होणार आहे. रायगड जिल्हयातील माणगाव तालुका खरेदी विक्री संघाने घरपोच रेशन योजना सुरू केली आहे. त्यामुळे गोरगरीब रेशन कार्ड धारकांना घरबसल्या रेशनचे धान्य मिळणार आहे. परवानाधारक संस्थेने घरपोच रेशन पुरवण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.
माणगावच्या प्रांताधिकारी प्रचाली दिघावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत खांदाड आदिवासीवाडी येथे या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष निलेश थोरे उपस्थित होते.
या संस्थेकडे 550 रेशनकार्ड धारक कुटुंब आहेत. प्रत्येक वाडीवस्तीवर जावून कार्ड धारकांना मंजूर असलेले धान्य आता दिले जात आहे.त्यामुळे रेशनिंगमधील काळया बाजाराला आळा बसणार आहे.
तसेच कार्डधारकांची रेशनसाठी होणारी पायपीट थांबणार आहे. शिवाय कुणीही रेशनकार्ड धारक कुटुंब या धान्यापासून वंचित राहणार नाही.
अनेकदा रेशनच्या बाबतीत नागरीकांना अडचणी येतात कधीकधी बायोमेट्रीकचा प्रॉब्लेम येतो कुणाचे हाताचे ठसे बसत नाहीत रेशनिंगचं दुकान घरापासून दूर असतं मग पायपीट होते रिक्षाला पैसे खर्च करावे लागतात. रेशनच्या किंमतीएवढं भाडं भरावं लागतं अशावेळी त्यांना त्यांच्या हक्काचं धान्य त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हा मुख्य हेतू असल्याचे माणगाव तालुका खरेदी विक्री संघ अध्यक्ष निलेश थोरे यांनी सांगितले.
आम्हाला रेशनसाठी बाजारपेठेत जावं लागायचं ते खूप लांब आहे त्यात रिक्षाने ते धान्य आणावं लागायचं. त्यात पैसे खर्च व्हायचे पण आता आम्हाला घरच्या घरी धान्य यायला लागलं. आमचे पैसे वाचले तसेच चांगली सोय झाल्याचे लाभार्थी महिला मंगल पवार सांगतात.