आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं आणि त्यांनी उज्जल करिअर व्हावं यासाठी प्रत्येक पालक वेगवेगळ्या पातळ्यांवर झगडत असतात. पण कॉलेजमध्ये गेल्यावर आपला पाल्य नेमका काय करतो यावरही संपूर्ण नसलं तरी थोडं लक्ष देणं अपेक्षित असतं. जर मुलांना योग्य संगत आणि शिक्षण मिळालं नाही तर काय होतं याचं उदाहरण नुकतंच लोणावळ्यात पाहायला मिळालं आहे. येथे शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. विद्यार्थ्यांनी एकमेकांना कपडे फाटेपर्यंत मारलं. हे चित्र पाहिल्यानंतर नागरिकांना हे विद्यार्थी आहेत की गुंड असा प्रश्न पडला होता.
लोणावळ्यात बस स्टॅण्डवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाली. सोमवारी दुपारी ही घटना घडली. यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले असता विद्यार्थ्यांना समज देण्यात आली. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना बोलावून समज दिली आहे. अशी माहिती लोणावळा पोलिसांनी दिली आहे.
लोणावळयातील बस स्टॅण्डवर दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली. 15 ते 20 जणांनी एकमेकांना लाथा बुक्क्यांनी आणि कपडे फाटेपर्यंत मारलं. यात काही तरुणांना मुका मार लागला आहे, हे सर्व तरुण इयत्ता अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिलीय. बस स्टँडमधील काही कर्मचाऱ्यांनी मध्यस्थ केल्यानंतर हा वाद अखेर मिटला. दरम्यान या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.