कोल्हापूर : पुणे बॅंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली येथील पंचगंगेच्या पुलावरून पेट्रोल - डिझेलच्या टँकरची वाहतुक सुरू करण्यात आली आहे. पंचगंगेच्या पुलावरून पाणी जात असतानाही धाडसाने टँकरची वाहतूक सुरू करण्यात आली. आज दिवसभरात इंधनाचे ८ टॅंकर कोल्हापूरात दाखल झाले आहेत. प्रशासनाकडून हा मोठा धाडसी निर्णय घेण्यात आला असून जबाबदारीने इंधन वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
गेल्या ६ दिवसांपासून पंचगंगेचा अलीकडचा पुल पूरामुळे पूर्णपणे बंद होता. या पाण्यामुळे कोल्हापूर - मुंबई संपर्क तुटला होता. त्यामुळे कोल्हापूरात ६ दिवस इंधनाचा पुरवठाही बंद होता. मात्र नागरिकांचं जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
पंचगंगेच्या पूलावरुन अद्याप पाण्याचा प्रवाह सुरु आहे. पुलावर जेसीबी आडवा उभा करुन, या पुलावरुन नवीन इंधन उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न सुरु आहे.
मात्र पंचगंगेच्या पुलावरुन इतर कोणतीही वाहतूक सुरु झालेली नाही.
ज्या ठिकाणी पाणी ओसरलं आहे तिथे अत्यावश्यक केरोसिन आणि इतर इंधन पुरवण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.