प्रताप नाईक झी मिडीया कोल्हापूर : गणेश उत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलाय. त्यामुळं मंडळाचे सर्वच कार्यकर्ते कामाला लागलेत. यात कोल्हापूरातील महिला कार्यकर्त्याही मागे नाहीत. होय महिला कार्यकर्त्या.. कोल्हापूरातील प्रिन्स क्लबचा यंदाचा सार्वजनिक गणेश उत्सव महिला साज-या करणार आहेत.. या महिला फक्त नामधारी मंडळाच्या सदस्या झाल्या नाहीत, तर मंडळाच्या सर्व परवानग्यापासून ते वर्गणी गोळा करण्याचं काम सुद्धा त्या स्वत: करत आहेत.
छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर नगरीने समाजप्रबोधनाचा वारसा अजूनही कायम ठेवलाय. म्हणूनच कोल्हापूरला सामाजिक दृष्टिकोनातून एक वेगळं महत्व प्राप्त झालय. आता गणेश उत्सव म्हटल तर कार्यकर्त्याची लगबग हे नेहमीचच आहे. पण गणेश उत्सवामध्ये मंडळाचा सर्व कारभार महिलांच्याकडं हे आपण कधी ऐकलं नाही. पण हे यंदा घडलयं कोल्हापुरातील खासबाग इथल्या प्रिन्स क्लब मध्ये. मंडळाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत महिलांनी यंदा आम्हाला संधी मिळायला पाहिजे अशी आग्रही मागणी केली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता कार्यकर्त्यांनी मंडळाचा सर्व कारभार या रणरागीणींच्या हाती देऊन टाकला. सुरवातीला मंडळाच्या कार्यकर्त्यांना महिला फक्त नामधारी असतील असं वाटल होतं. पण प्रिन्स क्लबच्या महिलांनी सगळा कारभार आपल्या हातात घेवून सर्व परवानग्या आणि वर्गणी गोळा करायलासुद्धा स्वत:च बाहेर पडल्या...
समाजामध्ये महिला पुरुषांच्या खाद्याला खांदा लावून काम करत असल्याचं पाहतो. पण स्वत: पुढाकार घेवून घरोघरी वर्गणी गोळा करत असताना आपण महिलांना यापूर्वी कधी पाहिल्या नाहीत. पण खासबाग इथल्या प्रिन्स क्लब महिला सदस्या मात्र घरातील कामं आटोपून गणेश उत्सवाची वर्गणी घरोघरी जावून गोळा करत आहेत.
महिला घरो घरी वर्गणी मागत फिरत असताना अऩेकांना अश्चर्य वाटतय. पण प्रिन्स क्लबनं घेतलेला हा समाज परिवर्तनाचा निर्णय अनेकांना भावलाय. लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधनाच्या उद्देशानं सुरु केलेला सार्वजनिक गणेश उत्सवाच्या उद्देशाला अनेक ठिकाणी हरताळ फासला जातोय. पण कोल्हापुरातील खासबाग इथल्या प्रिन्स क्लबनं घेतलेला अनोखा समाज परिवर्तनाचा निर्णय गणेश उत्सवाचा खरा अर्थ अधोरेखित करतोय.