कोरोना, लॉकडाऊनचे विघ्‍न पार करुन बाप्‍पा फॉरेनला; मूर्तीकारांसमोरचे विघ्‍न कायम

कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका पेणच्‍या गणेशमूर्ती व्‍यवसायालाही बसला असतानाच यंदा लॉकडाऊनचे विघ्‍न  पार करत बाप्‍पा फॉरेनलाही  पोहोचले.  

Updated: Jul 8, 2020, 12:43 PM IST
कोरोना, लॉकडाऊनचे विघ्‍न पार करुन बाप्‍पा फॉरेनला; मूर्तीकारांसमोरचे विघ्‍न कायम title=

प्रफुल्ल पवार / अलिबाग : कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका पेणच्‍या गणेशमूर्ती व्‍यवसायालाही बसला असतानाच यंदा लॉकडाऊनचे विघ्‍न  पार करत बाप्‍पा फॉरेनलाही  पोहोचले. असे असले तरी मूर्तीकारांसमोरचे विघ्‍न मात्र कायम आहे. रायगड जिल्ह्यातील बाप्‍पांची पंढरी अशी ओळख असलेल्‍या पेणच्‍या गणेशमूर्ती व्‍यवसायाची कोरोनामुळे यंदा रयाच गेली आहे. 

पेण शहराला गणेशमूर्ती कलेचा दीडशे वर्षांचा  इतिहास आहे. स्‍वर्गीय  वामनराव देवधर यांनी सुरु केलेला गणेशमूर्ती बनवण्‍याचा व्‍यवसाय पेण शहर आणि आजूबाजूच्‍या गावांमध्‍ये मोठया प्रमाणात पसरला आहे. आज पेण तालुक्‍यात साडेचारशेहून अधिक कार्यशाळा आहेत यातून दरवर्षी जवळपास ४० लाख गणेशमूर्ती तयार केल्‍या जातात. यंदा मात्र यंदा या व्‍यवसायावर कोरोनाचे सावट आहे . मूर्तीकारांनी यंदादेखील आपल्‍याकडील मूर्ती परदेशी पाठवल्‍या परंतु दरवर्षीच्‍या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे.

गणेशमूर्ती व्‍यवसायातून पेणमध्‍ये दरवर्षी कोटयवधींची उलाढाल होते. परंतु यंदा  कोरोनामुळे  मुंबईतील व्‍यापारी , विक्रेते अजून फारसे इकडे फिरकले नाहीत. लॉकडाऊनमुळे दोन महिने गणेशमूर्ती गेल्‍या नाहीत. आता कुठे सुरू झालेलं पण पुन्‍हा मुंबई ठाणे कल्‍याण भागात लॉकडाऊन सुरु झाला. त्‍यामुळे तेथील ग्राहक यायचे थांबले आहेत. दुसरीकडे मुंबईत फुटपाथवर स्‍टॉल लावण्‍यासाठी अद्याप परवानगी मिळत नाही. त्‍यामुळे अजून ३० ते ४० टक्‍के मूर्ती जाणं बाकी आहेत. 

अपेक्षित संख्‍येत मूर्ती अजूनही विक्रीसाठी बाजारात गेल्‍या नाहीत . दुसरीकडे मूर्तीकारांनीदेखील यंदा कमी म्‍हणजे ५० टक्‍के  मूर्तीच  तयार केल्‍या आहेत . स्‍थानिक कारागीरांनाही त्‍यामुळे रोजगारावर पाणी सोडाले लागले आहे. कोरोनामुळे गणेशमूर्ती बनवण्‍याचा व्‍यवसाय संकटात आहे . बाप्‍पा ,  या जगावरील कोरोनाचे विघ्‍न  लवकरच दूरपार कर अशीच प्रार्थना हे मूर्ती‍कार  गणरायाकडे करीत आहेत.

दरवर्षी थायलंड , मॉरीशस , अमेरिका या ठिकाणी माझयाकडील  पाच हजार गणेशमूर्ती जातात. यंदा कोरोनामुळे केवळ २५ टक्‍के म्‍हणजे १२०० मूर्ती गेल्‍या. मॉरीशस आणि थायलंडलाच यंदा मूर्ती गेल्‍या. बाकीच्‍या ठिकाणी व्‍यापाऱ्यांनी मूर्ती नेलेल्या नाहीत. यंदा परदेशातील महाराष्‍ट्रीयन लोक भारतात आले आहेत, शिवाय कोरोनाची भीती त्‍यामुळे तिथं धंदा होईल की नाही याची त्‍यांना भीती आहे . काहींनी माल नेलाच नाही ज्‍यांनी नेला तो कमी नेला , असं पेण येथील मूर्तीकार दीपक समेळ सांगतात.

मूर्ती  तयार आहेत. यंदा गणेशोत्‍सव  लवकर असल तरी मूर्ती जायला पाहिजे, तशा जात नाही . पाव टक्‍काही विक्री झालेली नाही. गणपती तर बसणार सगळयांच्‍या घरी पण कसे जातील हे आम्‍ही पण सांगू शकत नाही. मी दरवर्षी सात हजार मूर्ती बनवतो यंदा केवळ साडेतीन हजार मूर्तीच बनवल्‍या आहेत. कारण दोन महिने लॉकडावूनमुळे कामच बंद होतं कारागीर घाबरुन कामावर आले नाही , असं अनंत समेळ यांनी सांगितले.