जर्मन बेकरीला 10 वर्षे पूर्ण ....

अंगावर शहारे आणणाऱ्या आठवणी

Updated: Feb 13, 2020, 10:58 AM IST
जर्मन बेकरीला 10 वर्षे पूर्ण ....  title=

पुणे : तारीख 13 फेब्रुवारी 2010, वेळ सायंकाळी सहा वाजून 56 मिनिटे...पुण्यातील जर्मन बेकरी मध्ये अचानक धमाका झाला. हा काही साधासुधा स्फोट नव्हता, तर एक महाभयंकर दहशतवादी हल्ला होता. या घटनेला आज दहा वर्षे पूर्ण होत आहेत. असं असलं तरी त्यावेळच्या अंगावर शहारे आणणाऱ्या आठवणी अजूनही पुणेकरांच्या मनात कायम आहेत.

बेकरीत नेहमीप्रमाणे ग्राहकांची गर्दी होती... कॉलेजातले तरुण-तरुणींचे ग्रुप, विदेशी पर्यटक, आऊटिंगसाठी बाहेर पडलेले पुणेकर असं वातावरण गजबजलेलं होतं. एवढ्यात एका बेवारस पिशवीनं घात केला. जर्मन बेकरीत अचानक एक मोठा स्फोट झाला. आरडाओरड सुरू झाली, किंकाळ्या उठल्या, लोक सैरावैरा धाऊ लागले, कुणाचं विव्हळणं, कुणाचं ओक्साबोक्शी रडणं... संपूर्ण वातावरण एका क्षणात पालटलं... जर्मन बेकरीमध्ये माणसांचे मृतदेह सगळीकडे विखुरले होते... अनेकांची शरीरं अंगभर जखमांनी भरली होती... सारं काही दचकवणारं होतं... भीतीनं गाळण उडवणारं होतं....

सुरुवातीला सिलेंडरचा स्फोट झाला असं वाटलं, मात्र तो स्फोट हा साधासुधा नव्हे तर दहशतवाद्यांनी घडवलेला शक्तिशाली बॉम्बस्फोट होता. स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी स्वतःहून पुढे येत जमेल तशा रीतीने मदत आणि बचाव कार्य राबवलं. ती दृश्ये आजही त्यांच्या डोळ्यासमोर ताजी आहेत.

या बॉम्बस्फोटात 17 निष्पाप नागरिकांचा बळी गेला... त्यात पाच विदेशी नागरिकांचा समावेश होता. त्यातले दोघे पुण्यातले होते. 56 नागरिक या स्फोटात जखमी झाले. जखमींमध्येही 10 विदेशी होते. जखमींना इनलॅक्स बुद्रानी, ससून, जहांगीर अशा हॉस्पिटल्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्या दिवशी या परिसरात आणीबाणीची परिस्थिती होती. पुण्यातल्या प्रसिद्ध जर्मन बेकरीचं नाव एका क्षणात एका वेगळ्याच कारणाने जगभरात पोहोचलं होत.

पुणे शहर पोलिसांसाठी हा मोठा धक्का होता. याआधी पुण्यातून संशयित दहशतवाद्यांना अटक झालेली होती. 2 वेळा किरकोळ स्वरूपाचे स्फोटही घडवण्यात आले होते. पण त्यात फारसं नुकसान झालं नव्हतं. पुण्यात दहशतवाद्यांचा स्लीपिंग सेल कार्यरत असून त्यांच्या कारवायांना इथून खतपाणी मिळत होतं. पण ते इथेच एवढा मोठा घातपात घडवतील अशी शक्यता तेव्हापर्यंत वाटत नव्हती. आशा हल्ल्यांना सामोरं जाण्याची पोलिसांची सदैव तयारी असते. तरीदेखील पोलीस असो वा आपल्या इतर सुरक्षा यंत्रणा हा हल्ला टाळू शकल्या नाहीत हे सत्य नाकारता येणार नाही. म्हणूनच ही घटना पोलिसांसाठीही एक मोठा धडा होती.

बॉम्बस्फोटानंतर राज्यातले आणि केंद्रातले बडे अधिकारी बडे नेते तसेच तपास यंत्रणा घटनास्थळी येऊन गेल्या. बॉम्बस्फोटाच्या घटनेनं हादरलेल्या पुण्याला धीर देण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवर झाला. जर्मन बेकरीचा हल्ला हा केवळ एका फूड जॉइंट वर झालेला हल्ला नव्हता. तो आपल्या देशावरचा हल्ला होता. अशावेळी हल्लेखोरांना सोडणार नाही अशा डरकाळ्या फोडल्या गेल्या. प्रत्यक्षात पुढे काय झालं आपण जाणतोच.

जर्मन बेकरी बॉंबस्फोटानंतर संपूर्ण शहर खडबडून जागं झालं. कोरेगाव पार्कमधील छाबड हाऊस, ओशो आश्रम अशा काही ठिकाणची सुरक्षा वाढवण्यात आली. कोरेगाव पार्कमध्ये स्वतंत्र पोलीस ठाणे देखील उभारल गेलं. कालांतराने ही सुरक्षा व्यवस्थाही हळुहळु सैल पडली. आता दहा वर्षानंतर वातावरण तसं शांत शांत आहे. याचा अर्थ पुढे काहीच घडलं नाही किंवा घडणार नाही असा अजिबात नाही. म्हणूनच जर्मन बेकरी घटना सदैव सावध राहण्याची आठवण करून देत राहणार आहे.