मुंबई : शासकीय रूग्णालयातला अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. रुग्णांची होणारी परवड अंगावर काटा उभी करणारी आहे. औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयानं त्यावरही कहर केलाय.. इथं घडलेला प्रकार धक्कादायकच नव्हे, तर संतापजनक आहे. रूग्णालयात सलाईनसाठी नेमकं काय केलं हे पाहिलात तर तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही.
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातला हा संतापजनक प्रकार पाहा... हातात सलाईनची बाटली घेऊन ही नऊ वर्षांची मुलगी आपल्या ऑपरेशन झालेल्या वडिलांजवळ उभी आहे. कुणालाही संताप यावा, अशीच ही घटना... एकनाथ गवळी यांच्या पायावर गेल्या सोमवारी छोटी शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्यांना जनरल वॉर्डात हलवण्यात आलं. तिथं त्यांना डॉक्टरांनी सलाईन लावलं. पण एवढ्या मोठ्या रुग्णालयात साधा सलाईन लावायचा स्टँड नसल्यानं त्यांच्या तिसरीत शिकणाऱ्या मुलीलाच हात उंच करून उभं करण्यात आलं. तब्बल अर्धा ते पाऊण तास ही मुलगी अशीच उभी होती.. तिची दया ना डॉक्टरांना आली, ना तिथल्या कर्मचा-यांना आली. अखेर कुणीतरी हटकल्यावर पाऊण तासानं कर्मचा-यांनी सलाइन स्टँडची सोय केली..
आपल्या मुलीवर ओढवलेला हा प्रसंग पाहून एकनाथ गवळींनाही दुःख झालं... पण बिच्चारे करणार काय? घरच्या गरीबीमुळं सरकारी कार्यालयात शस्त्रक्रिया करावी लागली. तिथं जी व्यवस्था आहे, त्यात कसंबसं भागवून घेणं एवढंच त्यांच्या हातात होतं. औरंगाबादच्या या घाटी रुग्णालयात प्रचंड गर्दी असते. क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण इथं येतात, हे जरी असलं तरीही रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अशी वागणूक मिळणं हे चुकीचे आहे. परंतु म्हणून काय इथले डॉक्टर आणि कर्मचारी माणुसकी हरवल्यासारखे वागणार का? हा सवाल आहे.