नाशिक : मला फक्त एकच पेय लागतं... आणि आमदारांनी नाशिकला आल्यावर माझ्यासाठी तेच पेय घेऊन यावं, अशी उघड उघड मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी केलीय.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणतं बरं ते पेय? गैरसमज करून घेऊ नका, कारण महाजन यांनी याही प्रश्नाचं उत्तर दिलंय. आमदारांना माहिती आहे, मला फक्त एकच पेय लागते. ते म्हणजे दूध. त्यामुळे नाशिकला आल्यावर मला दूध देत जा, असं गिरीष महाजनांनी म्हटल्यावर उपस्थितांत एकच हास्यकल्लोळ उडाला.
निमित्त होतं, माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या 'दूध एटीएम' वितरण केंद्राच्या उद्घाटनाचं... याच कार्यक्रमासाठी महाजन उपस्थित झाले होते.
आमदार कोकाटेंसह बहुतांश आमदारांना माहिती आहे इतर कोणतंही पेय मी घेत नाही... मला केवळ एकच पेय आवडते... आणि ते म्हणजे दूध... आता दूध वितरण केंद्र सुरु झालंय... त्यामुळे मी जेव्हा जेव्हा नाशिकला येईन तेव्हा मला सकाळी अर्धा लिटर आणि सायंकाळी अर्धा लिटर दूध देत जा... त्यात मी आनंदी राहीन... असं महाजन यांनी खेळीमेळीच्या वातावरणात म्हटलं.