पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं केलं बदं, गोंदियातील 'ही' शाळा पडली ओस; कारण काय?

Gondia School:  या शाळेला एकूण 5 शिक्षकांची गरज असताना 3 पदे रिक्त आहेत.

Updated: Jul 10, 2024, 12:35 PM IST
पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं केलं बदं, गोंदियातील 'ही' शाळा पडली ओस; कारण काय? title=
Gondia School

Gondia School: संपूर्ण राज्यात 1 जुलै 2024 पासुन शाळा सुरु झाल्यात आणि सर्वत्र शाळा प्रवेश उत्सव दिवस साजरा देखील करण्यात आला. मात्र अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या केशोरी जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वडेगाव-बंध्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ओस पडल्याचे दिसत आहे. इतर शाळांप्रमाणे ही शाळा सुरु झाली मात्र या शाळेत फक्त दोनच शिक्षक आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 

वडेगाव-बंध्या या जि. प प्राथमिक शाळेत एकुन 1 ते 7 वर्ग असून 112 विद्यार्थी या शाळेत आहेत मात्र शाळेला एक मुख्याध्यापक आणि एकच शिक्षक असुन या शाळेला एकूण 5 शिक्षकांची गरज आहे. असे असताना शाळेला दोनच शिक्षक दिले असून 3 पदे रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थांच्या पालकांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषदे विरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

शिक्षकांची नियुक्ती नाही

यावर्षी शिक्षक भरती सुरू असल्यानेवर्ग शिक्षक मिळतील अशी अपेक्षा पालक लावून होते. मात्र जिल्हा परिषदेने भरतीच्या पहिल्या टप्प्यात एकही शिक्षक या शाळेला दिला नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पासून सगळ्यांना निवेदन दिले. मात्र गोंदिया जिल्हा परिषद प्रशासनाने शाळेत शिक्षकांची अजुनही नियुक्ति केली नाही. त्यामुळे पालकांमध्ये तीव्र रोष व्यक्त करत पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविले नाही. तर जोपर्यंत शाळेत शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी व शाळा व्यवस्थापन समितीने घेतला आहे.

विद्यार्थ्यांच्या नुकसानाला शासन जबाबदार

तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानास शासन आणि जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार असेल असे पालकांनी म्हटलंय. तसेच शासनाने लवकरात लवकर शिक्षकांची नियुक्ति करावी अन्यथा आम्ही आपल्या पाल्याचा शाळा सोडल्याचा दाखला शाळेतून काढु असे पालकांनी सांगितले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन याकडे काय भूमिका घेते हे पाहण्या सारखे असेल.