पुणेकरांसाठी चांगली बातमी, शहरातील उद्याने होणार खुली

पुणे शहरातील उद्याने खुली होणार आहेत.

Updated: Oct 27, 2020, 11:19 AM IST
पुणेकरांसाठी चांगली बातमी, शहरातील उद्याने होणार खुली
संग्रहित छाया

पुणे : शहरातील उद्याने १ नोव्हेंबरपासून खुली होणार आहेत. कोरोना संसर्गामुळे  गेल्या सात महिन्यांपासून ही उद्यान बंद होती. मात्र आता १ नोव्हेंबरपासून उद्याने खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचा आदेश महापालिकेकडून लवकरच काढला जाणार आहे. 

कोरोना संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात असताना उद्याने खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र तरीही काही अटी आणि शर्थीच्या आधारावर ही उद्याने खुली केली जाणार आहेत. केंद्रीय पथकाने शहरातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतल्यानंतर डिसेंबर-जानेवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली. या पार्श्वभूमीवर उद्यानात वावरताना पुणेकरांनी योग्यप्रकारे आपली काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरापाठोपाठ पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मात्र, कोरोनावर मात करण्यात शहरात यश आहे. दरम्यान, धोका अजून टळलेला नाही. परंतु आता काही प्रमाणात वाढती कोरोना रुग्ण संख्या कमी होत आहे. मात्र, कोरोनाबाबत अद्यापही काळजी घेण्याची गरज आहे. त्यानुसार उद्याने सुरु करताना पुणे पालिकेने काही बंधणे घातलेली आहेत. याबंधानांचे पालन करणे सक्तीचे आहे.