चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी, सुवर्णपदक जिंकल्यावर केलं रोहित स्टाईल सेलिब्रेशन

Chess Olympiad 2024 India Gold Medal Celebration  : यंदा प्रथमच सुवर्ण पदकाला गवसणी घातल्याने खेळाडूंचा आनंद गगनात मावत नव्हता. यावेळी त्यांनी विजेतेपदाची ट्रॉफी उंचावताना रोहित शर्मा स्टाईल सेलिब्रशन केले. 

Updated: Sep 23, 2024, 02:16 PM IST
 title=
(Photo Credit : Social Media)

Chess Olympiad 2024 : चेस ऑलिम्पियाड 2024 मध्ये सहभागी झालेल्या पुरुष आणि महिलांच्या भारतीय संघाने स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला. 45 व्या चेस ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच भारताने या स्पर्धेत सुवर्ण पदकाची कामगिरी केली. अंतिम फेरीमध्ये भारताच्या पुरुष संघाने  स्लोव्हेनियाचा 3.5 - 0.5 ने पराभव केला तर महिला संघाने देखील अझरबैजानचा पराभव केला. यापूर्वी भारताच्या पुरुष संघाने  2014 आणि 2022 चेस ऑलिम्पियाडमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं, तर महिलांनी 2022 मध्ये चेन्नईमध्ये झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं होतं. परंतु यंदा प्रथमच सुवर्ण पदकाला गवसणी घातल्याने खेळाडूंचा आनंद गगनात मावत नव्हता. यावेळी त्यांनी विजेतेपदाची ट्रॉफी उंचावताना रोहित शर्मा स्टाईल सेलिब्रशन केले. 

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि टीमने टी 20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यावर एक विशेष प्रकारे ट्रॉफी उंचावून सेलिब्रेशन केले होते. ज्याबाबत खूप चर्चा झाली आणि व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला होता. चेस ऑलिम्पियाड 2024 जिंकल्यावर भारताचा  पुरुष आणि महिला संघ मंचावर हातात तिरंगा घेऊन उभा होता. यावेळी तानिया सचदेव आणि डी गुकेश यांनी ट्रॉफीसह रोहित स्टाईल आयकॉनिक वॉक करत सेलिब्रेशन केलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 2022 मध्ये मेस्सीने सुद्धा फिफा वर्ल्ड कप जिंकल्यावर असे सेलिब्रेशन केले होते. 

पाहा व्हिडिओ : 

चेस ऑलिम्पियाड 2024 च्या खुल्या विभागात यूएसएने 17 पॉईंट्स सह रौप्यपदक पटकावले तर उझबेकिस्तानने कांस्यपदक मिळवले. महिला विभागात, कझाकिस्तानने 18 पॉईंट्स  रौप्यपदक जिंकले, तर यूएसएने एकूण 17 पॉईंट्स कांस्यपदक पटकावले.

भारतीय खेळाडूंची सुवर्ण कामगिरी : 

भारताकडून डी गुकेशनेने चेस ऑलिम्पियाड 2024 मध्ये दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले. गुकेशने त्याच्या 10 सामन्यांपैकी 9  सामन्यांमध्ये विजय मिळवला तर एक सामना ड्रॉ झाला. तर पुरुषांमध्ये भारताच्या अर्जुन एरिगाईसीने सुद्धा 11 सामन्यांपैकी 10 सामन्यात विजय मिळवून त्याची सुद्धा सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषणा करण्यात आली. तर महिलांमध्ये हरिका द्रोणवल्ली, वैशाली रमेशबाबू, दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल, तानिया सचदेव आणि अभिजित कुंटे यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला संघाने चेस ऑलिम्पियाडमध्ये दुसरं सुवर्ण पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली.