औरंगाबाद : गेल्या चार वर्षांपासून मराठवाडा विशेषतः उस्मानाबाद जिल्हा दुष्काळात होरपळत होता. पाऊस मुंबई पुण्यात धो धो कोसळत होता. पण औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद या भागात पाऊस काही पडत नव्हता. नुसते काळे ढग यायचे पण बरसायचे नाहीत. यंदाही तिच अवस्था होती. लातूरला यंदा पुन्हा वॉटर ट्रेन आणण्याची तयारी केली होती. पण शनिवार आणि रविवार अशा दोन दिवस झालेल्या पावसानं लातूरकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढला आहे.
लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात पाणीच पाणी झालंय. दोन दिवसाच्या पाण्यानं यंदा लातूरकरांची तहान भागवली आहे. उस्मानाबादमध्ये पाणीबाणी होती. यंदा तर शेतकऱ्यांनी पेरण्याही केल्य़ा नव्हत्या. पण गेल्या आठवड्य़ापासून परतीच्य़ा पावसाचा उस्मानाबादमध्ये मुक्काम आहे. पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळं रब्बीचं पिक घेण्याची आशाही बळावली आहे.
दोन तीन वर्षात नदीला आलेलं पाणी पाहून उस्मानाबादकरांना पाण्यात पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळं काहींनी मांजरा नदीत पोहण्याची हौस भागवून घेतली. तर अनेक जण नदीला आलेले पाणी पाहण्यासाठी नदीकाठावर आले होते. या पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील गावागावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघालाच आहे.
राज्यातली इतर जनता पावसाला कंटाळली असली तरी मराठवाड्यातील जनता पावसामुळं सुखावलीय. या पावसामुळे मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.