समृद्धी महामार्गाविरोधातील लढ्यात फूट पाडण्यात सरकारला यश

जिल्ह्यात समृद्धी महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांच्या लढ्यात फूट पाडण्यात सरकारला यश आलं आहे. त्यामुळे इथं प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू झालंय. तरीही एका गावानं मुख्यमंत्र्याच्या महत्त्वकांक्षेपुढे अजूनही गुडघे टेकलेले नाहीत.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 14, 2018, 12:55 PM IST
समृद्धी महामार्गाविरोधातील लढ्यात फूट पाडण्यात सरकारला यश title=

नाशिक : जिल्ह्यात समृद्धी महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांच्या लढ्यात फूट पाडण्यात सरकारला यश आलं आहे. त्यामुळे इथं प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू झालंय. तरीही एका गावानं मुख्यमंत्र्याच्या महत्त्वकांक्षेपुढे अजूनही गुडघे टेकलेले नाहीत.

पिंपळगाव डुकरेमधले कचरू डुकरे पाटील सध्या निवांत आहेत. समृद्धी प्रकल्पात त्यांची अंदाजे साडेसहा एकर जमीन गेली आहे. जमीन बारमाही बागायती असल्यानं मोबदलाही घसघशीत मिळालाय. अंदाजे रुपये पावणेचार कोटी. राहात्या घराचं बांधकाम काढलंय. घरावर आणखी एक मजला चढवला जातोय. घरी एक गाडी आधीच होती. आता नवी कोरी चकचकीत दुसरी गाडीही दिमतीला अंगणात उभी राहिली आहे.

डुकरे पाटील पिंपळगावचे काँग्रेस तालुका अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न समितीचे माजी अध्यक्ष. ज्यावेळी नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा उठाव झाला. त्याचं इगतपुरीतलं नेतृत्व कचरू डुकरे पाटलांनी केलं. पण अलीकडेच त्यांनी अचानक आपल्या जमिनीचा समृद्धी महामार्गासाठी शासनाकडे व्यवहार केला. जमीन, काही झाडं, पाण्याची पाईप लाईन आणि शेड याचा मोबदला गेल्या 15 नोव्हेंबरला त्यांच्या बँक खात्यात जमा झालाय. आलेल्या पैशातून ते जवळपासच दुसरी जागा शोधतायत.

डुकरे पाटीलांनी जमीन प्रकल्पाला विकली आणि पाठोपाठ गावातल्या इतर शेतकऱ्यांनी आपल्याही जमिनी सरकारला दिल्या. पण शेतकरी खूष नाहीये. कचरु डुकरे पाटील पलटल्याची चर्चा गावात सुरू आहे. गावात ज्याला जमिनीचे चांगले पैसे मिळाले तो गप्प आहे, आणि जो असमाधानी आहे तो सरकारच्या नावानं बोटं मोडतोय.