हिवरेबाजार, राळेगणसिद्धीत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा खंडित

हिवरे बाजारमध्ये 30 वर्षांची परंपरा खंडित

Updated: Jan 5, 2021, 01:04 PM IST
हिवरेबाजार, राळेगणसिद्धीत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा खंडित

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील आदर्शगाव हिवरेबाजार आणि राळेगणसिद्धीत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न फसले आहेत. हिवरे बाजारमध्ये 30 वर्षांची बिनविरोधची परंपरा खंडित झाली आहे. ग्रामपंचायतीच्या 7 जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात उतरल्याने या गावात दुरंगी लढत होते आहे. विशेष म्हणजे पोपटराव पवार यांनाही निवडणुकीला सामोरे जावं लागतं आहे. एक शिक्षक त्यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. 

पद्मश्री पोपटराव पवार यांच्यामुळे 1990 पासून गावात बिनविरोध निवडणुकीची परंपरा सुरू झाली. तेव्हापासून हे गाव कधीच निवडणुकीला सामोरे गेले नाही. मात्र, यंदा प्रथमच गावकरी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. राळेगणसिद्धीत देखील 35 वर्षांची परंपरा गेल्यावेळेपासून मोडली असून यंदाही याठिकाणी निवडणूक होते आहे. बिनविरोध निवडणुका घेणारी गावं म्हणून हिवरेबाजार, राळेगणची ख्याती होती.

हिवरे बाजारमध्ये निवडणूक बिनविरोध होणार नसली तरी विकासाची प्रक्रिया खंडित होणार नाही अशी प्रतिक्रिया पोपटराव पवार यांनी दिली आहे.