ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच नंबर 1, मविआची पिछेहाट, महायुतीचा प्रयोग यशस्वी?

Grampanchayat Election : ग्रामपंचायत निकालांनंतर राज्यात भाजपच नंबर एकचा पक्ष म्हणून समोर आलाय तर महायुतीनंही बाजी मारलीय. पण महाविकास आघाडीची मात्र पिछेहाट झाल्याचं पाहिला मिळालं. 

राजीव कासले | Updated: Nov 7, 2023, 06:44 AM IST
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच नंबर 1, मविआची पिछेहाट, महायुतीचा प्रयोग यशस्वी? title=

Grampanchayat Election : राज्यातल्या ग्रामपंचायत निकालात भाजपच (BJP) नंबर एकच पक्ष ठरलाय. 2359 पैकी 691 जागा जिंकत भाजपनं जोरदार मुसंडी मारली. विशेषत: गावपातळीवरचं राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेचं (Shivsena) आव्हान मोडून काढत भाजप नंबर एकचा पक्ष झालाय.. अनेक ठिकाणी तर शिंदे गट विरुद्ध भाजप, अजित पवार गट विरुद्ध भाजप असं चित्र असतानाही भाजपनंच बाजी मारलीय. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसला आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीत कोणाची सरशी?
भाजप 691, काँग्रेस 332, शिंदे गट 296, ठाकरे गट 177, अजित पवार गट 328, शरद पवार गट 181 इतर 340

भाजपच्या यशस्वी घोडदौडीसोबत महायुतीचा (Mahayuti) प्रयोगही राज्यात यशस्वी ठरताना दिसतोय. मविआपेक्षा महायुतीला जवळपास दुप्पट जागा मिळाल्यात. 

महायुती - 1315, मविआ - 690, इतर - 340

ग्रामपंचायत निकालात भाजप क्रमांक एकच पक्ष राहिलाय.  नंबर दोनवर असणाऱ्या काँग्रेसपेक्षा भाजपला जवळपास दुप्पट जागा आहेत, तर या निवडणुकांमध्ये महायुती सुसाट निघालीय.. मराठा आरक्षणाचा पेटलेला मुद्दा, लोकसभा निवडणुकांच्या उंबरठ्यावर भाजप आणि महायुतीला मिळालेलं यश नक्कीच दिलासा देणारं आहे..

बारामतीत भाजपचा झेंडा
बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला राहिलाय. बारामती तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायती या पवारांकडेच जातात. मात्र पहिल्यांदाच पवारांची बारामतीतली यशस्वी घोडदौड भाजपनं रोखलीय. बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाचं वर्चस्व राहिलं असलं तरी दरवेळेप्रमाणे एकहाती सत्ता काही मिळवता आलेली नाही. बारामतीतील 31 पैकी 29 ग्रामपंचायतींवर अजित पवार गटानं विजय मिळवलाय. 2 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकलाय. बारामती तालुक्यातील चांदगुडेवाडी आणि पारवडी इथे भाजपचे सरपंच विजयी झालेत. 

अजित पवारांचं गाव असलेल्या काटेवाडीतही भाजपचा एक सदस्य निवडून आला यापूर्वी बारामतीवर पवारांचं एकहाती वर्चस्व राहिलंय. मात्र अजित पवार सत्तेत सामील असतानाच बारामतीत भाजपनं शिरकाव केलाय. पहिल्यांदाच बारामतीतल्या 2 ग्रामपंचायती भाजपकडे गेल्यात. त्यामुळे लोकसभेच्या दृष्टीनं भाजपसाठी हे निश्चितपणे दिलासादायक चित्र आहे.

ग्रामपंचायत धक्कादायक निकाल
ग्रामपंचायत निवडणूकीत अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागलेत. जुन्नर तालुक्यातील नारायणगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झालाय.इथे ठाकरे गटानं एकहाती सत्ता राखली आहे. तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेली आणि तमाशा पंढरी अशी ओळख असलेल्या नारायणगाव ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यात नारायणगाव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांचं गाव. मात्र नारायणगाव ग्रामपंचायतमध्ये उद्धव ठाकरे गटाने सत्ता कायम राखली आहे. 17 पैकी 16 उमेदवार विजयी झाले असून, सरपंचपद हे ठाकरे गटाकडे आले आहे. राज्यात अजित पवार गट महायुतीत सहभागी झाल्यानंतर अमोल कोल्हे अजितदादांच्या शपथविधी कार्यक्रमात होते. पण नंतर त्यांनी भूमिका बदलली. ते शरद पवार गटाकडे असल्याचं स्पष्ट झालंय. अमोल कोल्हेंचे गाव असलेल्या नारायणगावच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते, मात्र ठाकरे गटाने बाजी मारत कोल्हेंना दणका दिलाय.

कोकणात दीपक केसरकरांना धक्का
कोकणात चुरशीच्या ठरलेल्या वैंगुर्ला, दोडामार्गमधील ग्रामपंचायत निवडणुकीत शिक्षणमंत्री दीपक केसरकरांना मोठा धक्का बसलाय. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील वेंगुर्लेमधील चारपैकी तीन ग्रामपंचायतींवर भाजपनं वर्चस्व मिळवलंय, तर एका ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे गटाच्या सेनेनं वर्चस्व मिळवलं. या ठिकाणी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या शिवसेना शिंदे गटाला भोपळासुद्धा फोडता आलेला नाही. दीपक केसरकर यांनी सात ठिकाणी आपलं पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. मात्र हे पॅनल सपशेल अपयशी ठरले आहेत. सत्तास्थापनेवेळी शिंदे गटाची भूमिका जनतेत पोहचवण्याची मोठी भूमिका दीपक केसरकरांनी निभावली होती. मात्र आपल्याच मतदारसंघातील जनतेचा कौल राखण्यात त्यांना अपयश आल्याचं दिसतंय.