close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नऊ खरेदीदार विरुद्ध कर्नल गायकवाड; असा आहे 'गुळाणी'तल्या जमीन खरेदीचा वाद

या जमिनीच्या वादावरून यापूर्वीही एकमेकांवर राजगुरूनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे

Updated: Jun 26, 2019, 07:18 PM IST
नऊ खरेदीदार विरुद्ध कर्नल गायकवाड; असा आहे 'गुळाणी'तल्या जमीन खरेदीचा वाद

हेमंत चापुडे, झी २४ तास, पुणे : खेड तालुक्यातील गुळाणी गावात ६४ एकर जमिनीचा वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. या प्रकरणात आता कर्नल केदार गायकवाड यांच्यासह इतर ३० ते ४० जवानांच्या नावे खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ सुहास वारके यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली.

६४ एकर जमीन आणि ९ खरेदीदार... याच जमिनीवरून खेड तालुक्यातील गुळाणी गावातला वाद मोठा विकोपाला गेला आहे. मुळशी तालुक्यातील हिंजवडी मान येथील सुनिल भरणे यांच्यासह एकूण नऊ जणांनी ही जमीन दीड वर्षांपूर्वी खरेदी केली होती. ही जमीन ते स्वतः कसत असल्याचंही ते सांगत आहेत. 


गुळाणी गावात लष्करी गाड्या

परंतु, या जमिनीचे वडिलोपार्जित मालक असलेले आणि लष्करात उच्चपदस्थ अधिकारी असलेले कर्नल केदार गायकवाड यांनी गावात बेकायदा सैन्यदलाचे जवान आणत शेताची नासाडी केली आहे, असा आरोप सुनिल भरणे यांनी केला आहे. जमीचे खरेदीदार सुनिल भरणे यांनी खेड पोलिसात याबाबत तक्रार केली आहे.

दरम्यान ही जमीन आमची वडिलोपार्जित जमीन असून माझ्या वडिलांची फसवणूक करून ही जमीन खरेदी करण्यात आली, असा आरोप कर्नल केदार गायकवाड यांनी केला आहे. याशिवाय गुळाणी गावात दहशत माजवण्यासाठी नव्हे तर सेनेतील जवान मित्र आपल्याला भेटण्यासाठी आले होते, असं कर्नल केदार गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. 

या सर्व प्रकरणी न्यायालयीन चौकशीही सुरू आहे. या जमिनीच्या वादावरून यापूर्वीही एकमेकांवर राजगुरूनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणी राजगुरूनगर पोलीस स्टेशनमध्ये आता एकमेकांविरोधात परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला असून याची उच्च अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. मात्र याबाबत पोलिसांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.