घरी आलेलं पार्सल उघडल्यानंतर महिला हादरली, आत भरला होता चक्क मृतदेह; सोबत मिळाली चिठ्ठी 'आम्हाला...'

आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात एका महिलेने घऱी आलेलं पार्सल उघडल्यानंतर आत मृतदेह होता. यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली.   

शिवराज यादव | Updated: Dec 20, 2024, 02:17 PM IST
घरी आलेलं पार्सल उघडल्यानंतर महिला हादरली, आत भरला होता चक्क मृतदेह; सोबत मिळाली चिठ्ठी 'आम्हाला...' title=

आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात एका महिलेने घऱी आलेलं पार्सल उघडल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. याचं कारण आतमध्ये चक्क एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह होता. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील उंडी मंडळातील येंडागंडी गावात ही भयानक घटना घडली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. ही मृतदेह 45 वर्षीय पुरुषाचा असून, 4 ते 5 दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा असं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

नागा तुलसी नावाच्या एका महिलेने घर बांधण्यासाठी आर्थिक मदतीसाठी क्षत्रिय सेवा समितीकडे अर्ज सादर केला होता. समितीने त्या महिलेला घरासाठी टाइल्स पाठवल्या होत्या. तिने पुन्हा बांधकामात आणखी मदत मिळावी यासाठी पुन्हा एकदा क्षत्रिय सेवा समितीकडे अर्ज केला होता. समितीने वीज उपकरणं देण्याचे आश्वासन दिलं होतं. नागा तुलसी यांना व्हॉट्सअॅपवर एक मेसेज मिळाला होता की तिला दिवे, पंखे आणि स्विच यासारख्या वस्तू पुरवल्या जातील.

एका व्यक्तीने गुरुवारी रात्री महिलेच्या घराबाहेर एक बॉक्स डिलिव्हर केला होता. यामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणं असल्याची माहिती देण्यात आली होती. पण जेव्हा महिलेने बॉक्स उघडून पाहिला तेव्हा त्यात चक्क मृतदेह होता. महिलेच्या कुटुंबीयांनाही मृतदेह पाहिल्यानंतर धक्का बसला. त्यांना तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलीसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. 

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णलयात पाठलला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अदनान नईम अस्मी यांनीही गावाला भेट दिली आणि प्रकरणाची चौकशी केली.

या पार्सलमध्ये एक पत्रही सापडलं आहे. यामध्ये 1 कोटी 30 लाखांची मागणी करण्यात आली आहे. जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर कुटुंबाला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी पत्रात देण्यात आली आहे. 

पोलीस ज्याने पार्सल डिलिव्हर केलं त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच क्षत्रिय सेवा समितीच्या प्रतिनिधींना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मृतदेह 45 वर्षीय पुरुषाचा आहे. 4 ते 5 दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांना संशय आहे.

या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. तसंच दुसरीकडे पोलीस जवळच्या परिसरांमधून बेपत्ता झालेल्या व्यक्तींची माहिती घेत आहेत.