Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी जयश्री पाटील या दोघांनाही सहकार खात्याने मोठा दणका दिला आहे. दोघांचेही संचालकपद रद्द करण्यात आल्याचे समोर आले आहे. सदावर्ते दांपत्य यापुढे तज्ञ संचालक म्हणून बँकेवर राहू शकणार नाहीत. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता या प्रकरणात सदावर्ते दाम्पत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
4 ऑक्टोबर 2023 रोजी कामगार संघटनेने केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीत नमूद केले होते की, सदावर्ते पॅनलच्या संचालकांनी यवतमाळ येथे एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी सर्व सभासदांना अहवालाचे वाटत करण्यात आले नव्हते. त्यावर नथुराम गोडसे यांचे फोटो प्रिंट करण्यात आले होते.वास्तविक पाहता एसटी बँक, एसटी कर्मचारी यांचा या राजकारणाशी काहीही संबंध नव्हता, असं या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे पूर्वी सर्व सभासदांना १४ दिवस आधी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना देणे आवश्यक होते. परंतु अशा कुठल्याही सूचना या संचालक मंडळाकडून देण्यात आल्या नव्हत्या. आपल्या मर्जीतील सभासद बोलवून, हवे त्या विषयांना मंजुरी मिळवून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. मुख्य म्हणजे पोटनियम बदलाची सुचना सभासदांना देणे बंधनकारक होते, असं तक्रारीत म्हटलं. दरम्यान, या ठिकाणी बँकेचे तज्ञ संचालक म्हणून सदावर्ते पती-पत्नीची निवड बेकायदेशीर रित्या करण्याचा ठराव आणला तो ठरावही सहकार खात्याने रद्द केल्यामुळे आता यापुढे सदावर्ते पती-पत्नी स्वीकृत संचालक म्हणून राहणार नाहीत,
बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष हे निर्वाचित संचालकांमधून असावेत असेही प्रकारचा ठराव त्यांनी बेकायदेशीररित्या केला होता. या ठरावाला सहकार खात्याने नामंजूर केले आहे. एस टी बाहेरच्या लोकांना बॅंकेच्या सदस्यत्व देण्याचा ठरावही नामंजूर करण्यात आला आहे. या आणि अशा प्रकारच्या एकूण १३ बेकायदेशीर विषयांची तक्रार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सहकार खात्याकडे केली होती. यातील बहूसंख्य विषयांना स्थगिती देण्यात आली आहे. यापुढे सदावर्ते यांचा कुठलाही संबंध आता एसटी बँकेशी राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांनी हे वृत्त फेटाळले आहे. खोट्या बातम्या पसरवल्या जातात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.