अमरावती : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, आज अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा जबर फटका बसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस असतांनाच तिकडे विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा आणि परिसरातील गावात अवकाळी पावसामुळे व गारपीटीने हजेरीं लावल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
काढणीला आलेला गहू, हरभरा व मक्याही पावसामुळे भिजल्याने रब्बी हंगामातील गहू पीकही शेतकऱ्यांच्या हातातुन निघून गेले आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पाच वाजताच्या दरम्यान चिखलदरा परिसरात जोरदार वारा व अवकाळी पाउस व गारपीट झाली. त्यामुळे चिखलदरा मध्ये अनेक ठिकाणी गारांचे ढीग लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यातच या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे.
कर्नाटक ते पश्चिम मध्य प्रदेशमध्ये कमी दाबाची स्थिती निर्माण झाली आहे. यासोबतच मध्य महाराष्ट्रावर 900 मीटर उंचीवर चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे वातावरणाच्या मधल्या थरात वाहणारे बाष्पयुक्त पश्चिमी वारे आणि खालच्या पातळीवर पूर्वेकडून वाहणारे वारे यांच्या संयोगातून विदर्भात 21 मार्चपर्यंत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि वारे वाहण्याची शक्यता आहे. मध्य भारतात २४ तारखेपर्यंत ढगाळ वातावरणाचा तसेच पावसाची शक्यता असल्याचा अंदाजही बंड यांनी वर्तवला.