शिरपूर : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच घडामोडींना वेग आलेला असताना आर्थिक देवाणघेवाणीलाही वेग येण्याचं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात आणि देशात विविध ठिकाणी वाहन तपासणी सुरु करण्यात आली आहे. अशाच वाहन तपासणीदरम्यान, यवतमाळच्या शिरपूर येथे एका कारमध्ये दहा लाखांहून जास्त रक्कम रोक़ड स्वरूपात जप्त करण्यात आली आहे.
आंतरजिल्हा नाकाबंदीदरम्यान यवतमाळच्या शिरपूर इथे एका कारमध्ये १० लाख ८० हजाराची रोकड सापडली. २०१९ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र वाहन तपासणीच्या सुरू असणाऱ्या सत्रात ही कारवाई करण्यात आली. वणी तालुक्यातील शिरपूर पोलिसांनी अभय फाट्याजवळ वाहनांची तपासणी सुरू केली असता एका कारमध्ये १० लक्ष ८० हजार रुपये आढळले.
चंद्रपूर जिल्ह्यातील कोपरणा येथील रहिवासी असलेल्या आशिष विधाते आणि सचिन गिरसावळे यांच्याकडून ही रक्कम जप्त करण्यात आली. इतकी मोठी रक्कम नेमकी कोणाली आणि आणि ती कशासाठी, कोणासाठी नेली जात आहे याबाबतच्या तपासाला आता वेग आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये कार चालकाला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची पोलिसांना समाधानकारक उत्तरं मिळत नसल्यामुळे आता संशय हा राजकीय हालचालींवरच जात आहे. त्यामुळे आता तपासातून नेमकी काय माहिती पुढे येते हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल.